संदीप बोडवेमालवण : भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांचा ताफा आहे. भारताला ७,५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते.छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ. स. १९३४ मध्ये ब्रिटिशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती.
नौदल दिनपाकिस्तान सोबतच्या १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी ‘नौदल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सध्या ॲडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.
अत्याधुनिक ताफा..भारतीय नौदलाकडे जवळपास १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहेत. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
भारतीय नौदल संघटनवेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड आणि सदर्न नेव्हल कमांड हे भारतीय नौदलाचे तीन कमांड आहेत. प्रत्येक कमांडच्या अधिकार क्षेत्रामधील नौदल क्रियाकलाप ही त्यांची जबाबदारी आहे. पूर्व नौदल कमांड विशाखापट्टणम येथे, दक्षिणी नौदल कमांड कोचिन येथे आणि पश्चिम नौदल कमांड मुंबई येथे स्थित आहे.
भारतीय नौदल फ्लीट..भारतीय नौदलाच्या ताफ्यात विमानवाहू जहाजे, पाणबुड्या, फ्रिगेट्स, विनाशक, कॉर्वेट्स आणि पेट्रोलिंग क्राफ्टसह जहाजांची विस्तृत श्रेणी आहे. ‘आयएनएस विक्रांत’ ही भारताची पहिली विमानवाहू नौका होय.आता ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका नौदलात कार्यरत आहे. भारतातील पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ ही भारतीय नौदलाच्या मालकीच्या अनेक पाणबुड्यांपैकी एक आहे. ‘आयएनएस इन्फाळ, आयएनएस कोलकाता, आयएनएस चेन्नई’ या भारतीय नौदलाच्या ताफ्यातील शक्तिशाली विनाशक आहेत. यांच्याकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. यातील ‘आयएनएस इन्फाळ’ जगातील घातक क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या क्रूझ व ब्रह्मोस मिसाइलने सज्ज आहे.
नौदलातील मार्कोस कमांडो..भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही विभागांच्या स्वतंत्र कमांडो फोर्स आहेत. लष्करात स्पेशल फोर्स आणि पॅराकमांडो, हवाई दलात गरूड फोर्स तर नौदलात मार्कोस कमांडो आहेत. नौदलात सहभागी असलेल्या मार्कोसला अनेक मोहिमांसाठी प्रशिक्षित केले जाते. ते समुद्रात, हवेत आणि जमिनीवर मोहिमा राबवू शकतात. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळ, विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स आणि मोहिमांवर गुप्त हल्ले करू शकतात.
आत्मनिर्भर आणि मेक इन इंडिया :‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे गतवर्षी कोचिन शिपयार्ड येथे पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण झाले. आत्मनिर्भर भारतासाठी हा दिवस अविस्मरणीय असाच आहे. स्वदेशी बनावटीच्या ७६ टक्के सामग्रीसह २६२.५ मीटर लांब आणि ६१.६ मीटर रुंदीच्या या युद्धनौकेवर अनेक अत्याधुनिक उपकरणे/यंत्रणा तसेच सुमारे १,६०० अधिकारी आणि खलाशी असा चालकवर्ग आहे.