लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण (जि. सिंधुदुर्ग) : नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. याबाबत स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणार असल्याचे सांगण्यात आले. पुतळा उभारणी कामात शासनाशी समन्वयक म्हणून याच दोन अधिकाऱ्यांनी काम पाहिले होते.
या अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजलेला नाही. पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी दिली.
काम करणाऱ्यांना वाऱ्याचा अंदाज आला नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली आला ही आपल्या सगळ्यांसाठी दु:खद घटना आहे. मात्र, त्याच्यावर जे राजकारण चालले आहे ते अधिक वेदनादायी आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नेव्हीने चांगल्या हेतूने हा पुतळा तयार केला होता. मात्र, त्यांनी ज्यांना काम दिले त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचे आकलन करता आले नाही. त्या हिशोबाने त्यांना त्याचे डिझाइन करता आलेले नाही किंवा समुद्राच्या वाऱ्यामुळे लोखंड गंजते का याचे आकलन नव्हते का? याची चौकशी सुरू आहे. आम्ही नेव्हीच्या मदतीने तेथे पुन्हा महाराजांचा भव्य पुतळा उभा करू, असेही फडणवीस म्हणाले.
मविआचा आज निषेध मोर्चामालवण येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी मालवण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत.