राजापूर : शासनाने पर्ससीन मच्छीमारांवर लादलेल्या जाचक अटी व निर्बंधांविरोधात मच्छीमार बांधवांकडून दि. १० मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. या महामोर्चात मच्छीमार बांधवांसोबत सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. पर्ससीन मच्छीमारांना न्याय मिळाला पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही यशवंतराव यांनी यावेळी सांगितले. या मोर्चाबाबत यशवंतराव यांनी साखरीनाटे परिसरातील मच्छीमार बांधवांशी सोमवारी चर्चा केली. मुंबईत आझाद मैदान येथे मच्छीमार बांधवांकडून काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला आपला पाठिंबा असून, राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. या महामोर्चाला आपण उपस्थित राहणार असल्याचेही यशवंतराव यांनी सांगितले. शासनाने लादलेल्या जाचक अटींंमुळे मच्छीमार बांधवांच्या रोजीरोटीवरच गदा आली असून, शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही यशवंतराव यांनी सांगितले. त्यामुळे मच्छीमार बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी साखरीनाटे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अन्वर धालवलकर, मच्छीमार मकसूद हुना, माजी सरपंच शादत हबीब, ग्रामपंचायत सदस्य सफीर फणसोपकर, सलाऊद्दीन हातवडकर, मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष वजुद बेबजी, आसिफ म्हसकर, सिकंदर हातवडकर, नियाज मस्तान, आदींसह मच्छीमार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी साखरीनाटे भागातील मच्छीमार बांधवांनी आपल्या समस्या यशवंतराव यांच्याकडे मांडल्या. मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही यशवंतराव यांनी दिली. (प्रतिनिधी)कुतुहल : पक्षांची भूमिका कशी बदलली?काही वर्षांपूर्वी पर्ससीन नेटला अनेकांचा विरोध होत होता. नेटने छोट्या मच्छीची मरतूक होत असल्याने हा विषय आठ ते दहा वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरला होता. हा विषय पुन्हा चर्चेत आला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आंदोलनात ‘पर्ससीन’च्या बाजूने उभे राहण्याचे कारण काय? हा मुद्दाही यामुळे चर्चेला आला आहे.
राष्ट्रवादीही शिवसेनेबरोबर
By admin | Published: March 07, 2016 11:25 PM