महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : तीन वर्षांपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी खिळखिळी बनली आहे. मागील तीन वर्षात राष्ट्रवादीला यश प्राप्त करता आले नाही. त्या पार्श्वभूमिवर अजित पवार कोणती भूमिका मांडतात आणि कार्यकर्त्यांना कसे प्रौत्साहीत करतात याकडे सिंधुदुर्ग जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पवार यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील घरघर थांबेल ? असा आशावाद कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवार ३0 आॅक्टोबर रोजी सिंंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषी भवनमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे.
तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे सावंतवाडीतील तत्कालिन आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश मिळविला. त्यानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यातील ताकद खिळखिळी बनली. केसरकर यांच्या समवेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी एका पाठोपाठ एक शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीची नौका डुंबायला सुरूवात झाली होती.
वर्षभरापूर्वी मालवण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने-काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यानंतर कुठल्याही निवडणुकीत मग जिल्हा परिषद, पंचायत समिती असो किवा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळविता आले नाही.
केवळ दोडामार्गमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनी काँग्रेसशी जुळवून घेत आपल्या पॉकेटमध्ये थोडे फार यश मिळविले. म्हणजे राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेला एकच सदस्य निवडून आला आणि तो दोडामार्गमधील आहे. तर पंचायत समितीला राष्ट्रवादीची एक जागा दोडामार्गात निवडून आली आहे.
आता २0१९ मध्ये विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने युती शासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमिवर सिंधुदुर्गातून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.
मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी ठेवली जिवंतजिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साहाचे वातावरण पसरले होते. जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश युवक उपाध्यक्ष अबीद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, नंदूशेठ घाटे, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, जिल्हा युवक अध्यक्ष विनोद जाधव आदी काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी जिवंत ठेवली. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या मागे कार्यकर्तेच शिल्लक न राहिल्याने राष्ट्रवादीची जिल्ह्यातील घौडदौड रोखली गेली.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहसरकारविरोधी आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी पक्षाने निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे. कारण गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
महागाईचा दर, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, कर्जमाफीबाबत साशंकता अशा अनेक मुद्द्यांवर जनमानसात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना या मुद्द्यांवर साकडे घालून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केला जाणार आहे.