राजापूर : सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतील महिला सदस्याने आपल्या बाजूने मतदान करावे, यासाठी त्या महिलेला व तिच्या पतीला लाच देताना ओणी ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच शौकत महमूद हाजू हे रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी ही कारवाई केली. या घटनेने सत्ता हस्तगत करण्याची खेळी राष्ट्रवादीच्या अंगलट आली.रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश विलासराव गुरव यांनी राजापूर पोलिसांत दिलेल्या व नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ओणी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीवरून हा प्रकार घडला असल्याचे समजते. सेनेच्या महिला सदस्या मीनल जनेश गोरुले यांच्याशी संपर्क साधण्याचे काम ओणीचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे नवनियुक्त सदस्य शौकत महमद हाजू यांनी केले. सरपंचपदाच्या निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी हाजू यांनी गोरुले यांना ५ आॅगस्टला २६ हजार रुपये दिले. तसेच या महिला सदस्याचे पती जनेश गोरुले यांच्या नावावर रेशनचे दुकान करून देतो, असे प्रलोभन दाखविले व त्याकामी आणखी २५ हजार रुपये देण्याचे हाजू यांनी स्पष्ट केले. याबाबतची सविस्तर कल्पना महिला सदस्या व तिच्या पतीने ओणीतील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी शरद लिंगायत यांना दिली. त्यानंतर ही खबर आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत जाताच सापळा रचण्यात आला. तत्काळ जिल्हा ‘लाचलुचपत’ विभागाशी संपर्क साधून त्यानुसार ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक सतीश गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरल्यानुसार शनिवारी रात्री शौकत हाजू यांच्याकडे आपला मोर्चा वळवला. त्या रात्री शौकत हाजू हे शिवसेना महिला सदस्या मीनल गोरुले यांच्या घरी गेले व ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपये देत असतानाच ‘लाचलुचपत’ विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक सतीश गुरव यांच्यासहित पोलीस निरीक्षक दीपक बर्गे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना शिवगण, गौतम कदम, बाबू जाधव, पोलीस हवालदार संतोष कुवळेकर, दिनेश हरचकर, पोलीस नाईक नंदकिशोर भागवत, प्रकाश सुतार, प्रवीण वीर, महिला पोलीस जयंती सावंती उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य महिलेला २६ हजार व तिच्या पतीला रेशन दुकान नावावर करून देतो, या प्रलोभनापोटी २५ हजार, अशी एकत्रित रक्कम ५१ हजार पकडण्यात आलेल्या शौकत हाजू यांनी दिल्याचे स्पष्ट झाले. ओणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आपल्या बाजूने मतदान व्हावे, याच उद्देशाने हा प्रकार घडला आहे. (प्रतिनिधी)राजकीय खेळीओणी ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ सदस्य असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा सदस्य शिवसेनेचे, तर तीन सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले होते. आज, सोमवारी सरपंचपदाची निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर सेनेचे दोन सदस्य फोडण्याची खेळी राष्ट्रवादीत चालली होती.
राष्ट्रवादीच्या सदस्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2015 12:02 AM