कणकवली: सिंधुदुर्गातआरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. जिल्हा रुग्णालयात महिलांची प्रसूती देखील होत नाही. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्यसेवेसाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. अधिवेशनात जर आरोग्य मंत्री रुग्णव्यवस्था चांगली असल्याचे सांगत असतील. तर जिल्ह्यातील रुग्णांना कोल्हापूर किंवा गोवा या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्याची वेळ का येते? याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन सुनीता रामानंद यांची शासनाने तातडीने बदली करावी. तसेच रुग्णांना आवश्यक सुविधा जानेवारी पर्यंत न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस डीनच्या दालनाच्या दरवाजाला टाळे ठोकेल असा इशाराही दिला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सामंत म्हणाले, महायुतीचे सरकार आरोग्यसेवा देताना अपयशी ठरत आहे. राष्ट्रवादीने जिल्हा रुग्णालयाकडे काही मागण्या केल्या होत्या. मात्र, डीन सुनीता रामानंद यांनी त्या पूर्ण केलेल्या नाहीत. संपूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोडमडलेली आहे. जिल्हा रुग्णालयातून एक रुग्ण गोव्यात पाठवला, त्याला तिथे घेतले नाही. त्याला आता कोल्हापूरला अधिक उपचारासाठी पाठवावे लागले. अशी अनेक उदाहरणे आहेत. पालकमंत्री आणि सरकार याकडे लक्ष देणार का? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन यांना काम करायचे नाही. जिल्हा रुग्णालयाचा कारभार आता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे राहिलेला नाही. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगूनही सुनीता रामानंद यांनी आपला कारभार सुधारलेला नाही. त्यामुळे त्यांना ताबडतोब हटवून त्यांची बदली करावी. फक्त कागदावर रुग्ण सेवेबाबत अहवाल चांगला दाखवून काय उपयोग ? रुग्णांना गोवा, कोल्हापूर पाठवण्याची वेळ का येते? तो अहवाल चुकीचा असल्याचा आरोप सामंत यांनी केला.पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नजीर शेख, रुपेश जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
..अन्यथा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या दालनाला टाळे ठोकणार, अमित सामंत यांचा इशारा
By सुधीर राणे | Published: December 09, 2023 6:11 PM