कणकवली : केंद्र शासन दिवसेंदिवस पेट्रोल , डीझेल , घरगुती गॅसची दरवाढ करीत आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाले असून, त्यांचे जीवनमान हे फार हालाकीचे झाले आहे. तसेच या दरवाढीमुळे सर्वस्तरावर खर्च वाढला आहे . विविध प्रकारची वाहतुक पेट्रोल ,डीझेल, गॅसवर अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम जीवनोपयोगी वस्तूंच्या किंमती वर झाला आहे. गेल्या ६५ वर्षात केव्हा नव्हे तेवढी इंधन दरवाढ यावर्षी झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेकणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .तसेच या इंधन दरवाढीच्या विरोधात तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन देखील देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की , शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत . या दरवाढीमुळे सर्वसाधारण नागरिक हैराण झाले असून त्यांना जगणे मुश्कील झाले आहे. तसेच सर्वसामान्य माणूस केंद्र सरकारवर नाराज आहे . नागरिकांच्या या भावना आपल्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात. अन्यथा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरून दरवाढ कमी होईपर्यंत आंदोलन करेल. असा इशारा यावेळी देण्यात आला .या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग , कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर , दिगवळे जिल्हा परिषद मतदारसंघ विभाग अध्यक्ष अशोक पवार, मारुती पवार, चंद्रकांत नाईक , सेनापती सावंत, उत्तम तेली, किरण कदम, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अनवर साठी, सुजल शेलार, विनोद विश्र्वेकर , बंड्या शेवणी , राजेश पाताडे आदी उपस्थित होते. दरम्यान, तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्यावतीने निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .दर नियंत्रण समितीच्या कामाबाबत प्रश्नचिन्हयावेळी तहसीलदारांशी चर्चा करताना कोविड काळात खाजगी कोविड सेंटरकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचा आरोप अनंत पिळणकर यांनी केला. तसेच दर नियंत्रण समितीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासंदर्भात कोविड रुग्णांची बिले योग्य प्रकारे तपासणी करा व रुग्णांचे अवाजवी घेतलेले पैसे परत करा. अन्यथा दर नियंत्रण समितीच्या विरोधात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील पिळणकर यांनी दिला.
केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 3:41 PM
Ncp Kankavli Sindhudurg :केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .
ठळक मुद्देकेंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा कणकवलीत तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने ; तहसीलदारांना निवेदन