सिंधुदुर्गनगरी : नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला वेगळेच वळण लागले. सुमारे २०० कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मागण्यांचे निवेदन घेण्यास विलंब लावत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्याविरोधात अधिवेशनात हक्कभंग ठराव आणणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.नोटाबंदीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, असंघटित कामगारांना व मोलमजुरी करणाऱ्यांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास येथील शरद कृषी भवन येथून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा ‘मोदी सरकार हाय-हाय, नोटाबंदीचा निषेध असो’ अशा विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता धडकला. यावेळी पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपणास जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना भेटून मागण्यांच्या निवेदनाची प्रत द्यायची असल्याने आम्हाला आत प्रवेश देण्याची मागणी पोलिसांकडे केली. यावेळी आपण ठरावीक पदाधिकारीच जिल्हाधिकाऱ्यांना भेटू शकता असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांच्या सूचना धुडकावून राष्ट्रवादीच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्यासोबत पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे गेला.याच दरम्यान आमदार वैभव नाईक व जिल्हाधिकारी यांची दालनात चर्चा सुरू असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सुमारे १५ ते २० मिनिटे बाहेर प्रतीक्षा करावी लागली. आमदार चर्चा आटोपून दालनाबाहेर आल्यानंतर जिल्हाधिकारी आता आत बोलवतील अशी धारणा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी करून जिल्हाधिकारी दालनाच्या प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली. जिल्हाधिकारी कामात व्यस्त असल्याने शिष्टमंडळास आत बोलवायला वेळ झाला. याचा राग मनात धरून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत जिल्हाधिकारी हाय-हाय अशा एक ते दोन वेळा घोषणा देत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकाजवळ देण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, अबिद नाईक, रेवती राणे, चंद्रकांत पाताडे, प्रमोद धुरी, गुलाबराव चव्हाण, भास्कर परब, प्रभाकर तावडे, बाळा चव्हाण, नम्रता कुबल, भाई मालवणकर, विश्वास साठे, सचिन पाटकर, बाळा भोगले, महादेव बोर्डवेकर, संदीप गवस, रूपेश तुळसकर, प्रदीप चांदोस्कर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचा निषेधनोटाबंदीविरोधात एकाचवेळी संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आम्ही मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी गेलो; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ताटकळत बाहेर ठेवले. सर्वसामान्यांच्या होत असलेल्या त्रासाबाबत आवाज उठविण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे निवेदन स्वीकारणे आवश्यक होते; मात्र लोकशाहीचा अपमान करीत त्यांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केली, असा आरोप माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी केला.
नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Published: January 09, 2017 10:39 PM