सावंतवाडी : धूम्रपानाच्या सर्व गोष्टींवर बंदी आली पाहिजे. तरच देशाची युवा पिढी सुरक्षित राहील. गुटखा, तंबाखू, मद्यप्राशन या वस्तूंचे सेवन करून त्यांची पाकिटे, बाटल्या रस्त्यावरच टाकल्या जातात. यामुळे कचऱ्याची समस्या वाढत आहे. यामुळे सर्वप्रथम धूम्रपानयुक्त पदार्थांवरच बंदी आली पाहिजे, असे मत येथील जे. बी. नाईक कॉलेजच्या प्राध्यापिका हर्षवर्धिनी जाधव यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत साफसफाई करण्यात आली. या अनुषंगाने सावंतवाडी येथील जे. बी. नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात प्रा. जाधव बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक केदार म्हसकर, कार्यक्रम अधिकारी राकेश वराडकर आदी उपस्थित होते. गांधी जयंतीनिमित्त सर्व शासकीय कार्यालयांसह शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेचा शपथविधी पार पडला. तसेच सुमारे दोन तास आपले कार्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. सावंतवाडी शहरात साफसफाई व शपथविधीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. (वार्ताहर)
धूम्रपानयुक्त पदार्थांवर बंदी घालण्याची गरज
By admin | Published: October 02, 2014 9:55 PM