आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २१ : प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता वाढविणे आवश्यक असून जनतेला सेवा पुरविणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडून मोठी अपेक्षा बाळगली आहे. देशात सर्वच क्षेत्रात क्रांतीकारक बदल होत असून भावी काळामध्ये त्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करु अशी ग्वाही अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी दिली.जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित नागरी सेवा दिन कार्यक्रमात सावळकर बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे तहसिलदार शरद गोसावी, शुभांगी साठे, पुरवठा तहसिलदार जाधव, आपत्ती व्यवस्थापनच्या राजश्री सामंत, आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षक प्रवीण सोलकर आदी उपस्थित होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी सावळकर पुढे म्हणाले, प्रशासकीय सेवेमार्फत जनतेला सेवा पुरविणे हे आपले काम आहे. हे काम करीत असतांना त्या किती दिवसात पुरविल्या आहेत हे पाहण्याची गरज आहे. आपल्यात काम करण्याची क्षमता आहे. आपण सेवा करतो त्याबद्दल शंका नाही. परंतु ती क्षमता ठराविक कालावधीत अधिकारी व कर्मचा-यांनी पूर्ण करावी.राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिनी प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नवी दिल्ली विज्ञान भवन येथून या कार्यक्रमा दरम्यान दाखविण्यात आले. यावेळी विविध खात्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता वाढविणे आवश्यक : रविंद्र सावळकर
By admin | Published: April 22, 2017 1:40 PM