सावंतवाडी : आडाळी (दोडामार्ग) एमआयडीसीत येत्या चार दिवसात नवीन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या संदर्भात मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १२ मोठ्या उद्योजकांसमवेत बैठक झाली असून आडाळीत इंडस्ट्रीयल हब निर्मिती होणार असून तेथील जागा कमी पडेल. त्यामुळे लवकरच दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथील शासनाच्या १०० एकर जागेत दुसरी एमआयडीसी उभारण्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते मुंबई येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.केसरकर म्हणाले, जोपर्यंत मतदारसंघातील सर्व कामे मंजूर करून घेतली जात नाहीत, तोपर्यंत मी मतदारसंघात फिरकणार नाही. सर्व कामे शासकीय स्तरावर मंजूर करून आणल्यानंतरच येत्या चार-पाच दिवसात मतदारसंघात येणार असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.आंबोली, चौकुळ, गेळे या तीन गावांमध्ये ३५ सेक्शन वनजमिनीसंदर्भात लढा सुरू आहे. २५ वर्षांपासून या जमिनीच्या वाटपाचा निर्णय होत नव्हता. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जमीनप्रश्नाला स्थगिती दिली. ही स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उठविण्यात आली. या गावातील ३५ सेक्शन उठविण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचा प्रश्नही सुटलाआता सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. सुनावणी घेऊन वनविभागाने तसा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. जमीन वाटपाचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचा प्रश्नही सुटला आहे. सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. आज शेतकऱ्यांसमवेत नऊ हेक्टर जमिनीबाबत प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात ताज हॉटेल्सच्या टीमसोबत मुंबई येथून ऑनलाईन बैठक झाली. नऊ हेक्टर जमीन वगळण्यासंदर्भात ताजचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी अशी एकत्रित पाहणी करून जोपर्यंत या जमिनीचा प्रश्न सुटत नाही, तोवर तेथे कुठलेही काम करू नये, असे ठरविण्यात आले. तसेच लेखी पत्रानेही कळविण्यात येणार आहे असेही केसरकर यांनी सांगितले.बाऊन्सर संस्कृतीविरोधात लढा सावंतवाडी मतदारसंघातून वाईट प्रवृत्तीला मी कायमचं घालवणार आहे. मी यापूर्वी अनेकांविरोधात लढा दिला. माझा लढा आता या 'बाऊन्सर' संस्कृतीविरोधात असेल. सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारत टेंडरदरम्यान बाऊन्सर आणले. त्याची चौकशी करून या बाऊन्सरमागे कोण आहेत? याचा शोध घेतला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.