राजेश कांबळे -- अडरे -शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जन्मत:च मुलींना २१ हजार ५०० रुपये तर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंंतर १ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेमुळे मुलींचे भवितव्य उज्वल होण्यास मदत होणार आहे. पूर्वीच्या सुकन्या योजनेचे विलिनीकरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत करण्यात आले आहे. शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुलींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. शासनाने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना आणली आहे. समाजामध्ये मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता आणणे तसेच मुलींचा जन्मदर व त्यांच्या भविष्याकरिता आर्थिक तरतूद व्हावी, मुलींचे शिक्षण, आरोग्य उंचावण्यासाठी व बालिका भ्रूणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलीनंतर कुटुंब नियोजनास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पहिली मुलगी असेल आणि १ एप्रिल २०१६ रोजी दुसरी मुलगी झाली आणि दोन मुलींनंतर आॅपरेशन केल्यास अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये मुलींचे १८ वर्षापर्यंत लग्न होता कामा नये, ही अट ठेवण्यात आली आहे. मुलींना १८ वर्षानंतर १ लाख रुपये मिळणार असून, या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील किंवा दारिद्रयरेषेवरील दोन्ही गटातील मुलींना मिळणार आहे. यावेळी सासू-सासऱ्यांचाही सोन्याचे नाणे देऊन सत्कार केला जाणार आहे. शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.एकात्मिक बालविकास : बेटी बचावराज्यात मुलींचा जन्मदर कमी येत चालला आहे. मुलींचा जन्मदर कमी झाल्यास भविष्यात मुलींची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिल. या भीतीने ‘बेटी बचाव’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यालाच अनुसरून शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ही नवीन योजना जाहीर केली आहे.
मुलींसाठी नवी योजना ‘माझी कन्या भाग्यश्री’
By admin | Published: August 17, 2016 9:24 PM