रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटला आणि त्याचा सर्वाधिक मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या एस. टी. बसेस बेपत्ता झाल्यामुळे तब्बल २२जण बेपत्ता झाले आहेत. दुर्घटनेला २४ उलटले तरी त्यापैकी कोणाचाही ठावठिकाणा लागलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता होण्याचा प्रकार प्रथमच घडला असल्याने जिल्हा सुन्न झाला आहे.जयगड - मुंबई गाडी (एमएच २०-१५३८) सायंकाळी ६.३० वाजता जयगडहून सुटली होती. जयगडसह आजूबाजूच्या गावातील सुरेश सावंत (जयगड), अविनाश मालप (६८, कांबळे लावगण), प्रशांत प्रकाश माने (भंडारपुळे), स्नेहा सुनील बैकर (३०, रा. सत्कोंडी), सुनील महादेव बैकर (३५, रा. सत्कोंडी), अनिल संतोष बलेकर (सत्कोंडी), दीपाली कृष्णा बलेकर (सत्कोंडी), धोंडू बाबाजी कोकरे (वरवडे), जितू जैतापकर (राजापूर) हे प्रवास करीत होते. गाडी चिपळुणात आल्यानंतर ड्युटी बदलल्याने वाहक विलास काशिनाथ देसाई (४३, रा. सती-चिपळूण) चालक श्रीकांत शामराव कांबळे (५८, रा. सावर्डे पोलीस लाईन) यांनी बसचा ताबा घेतला होता. चालक एस. एस. कांबळे यांचा मुलगा महेंद्र श्रीकांत कांबळे हादेखील त्यांच्यासोबत होता. ही बस रात्री ९.१५ वाजता चिपळूणमधून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. मात्र, रात्री साडेअकरानंतर बसचालकासह कोणाचाही संपर्क झाला नाही.या दुर्घटनेत सापडलेली दुसरी गाडी राजापूरहून सुटली होती. राजापूर - बोरिवली या गाडीतून जी. एस. बाणे (३६ राजापूर), बाळकृष्ण बाब्या वरद (५१, नाणार - राजापूर), भिकाजी वाघधरे, ईस्माईल वाघू (दोघेही राजापूर), अजय सीताराम गुरव (४०, रा. ओणी) हे प्रवास करीत होते. मुंबईला निघालेले आवेज अल्ताफ चौगुले व अनिस अहमद चौगुले (काविळतळी - चिपळूण) हे चिपळूण बसस्थानकात या बसमध्ये चढले होते.मुंबईकडे प्रवास करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील चालक - वाहकांची ड्युटी चिपळुणात बदलते. त्याप्रमाणे चिपळूण येथे वाहक प्रभाकर भानुराव शिर्के (५८, रा. राजवाडी - संगमेश्वर) चालक जी. एस. मुंडे (४६, रा. गंगाखेड - परभणी) यांनी बसचा ताबा घेतला व गाडी मुंबईकडे रवानाझाली.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रक पी. एस. रसाळ, विभागीय वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी रत्नागिरी विभागातर्फे रत्नागिरी व चिपळुणात स्वतंत्र नियंत्रक कक्ष उभारण्यात आला आहे.एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता होण्याचा प्रकार प्रथमच घडला असल्याने जिल्हा सुन्न झाला आहे. (प्रतिनिधी)मोबाईलवर आवाज ऐकण्यासाठी धडपडराजापूर : महाडमधील दुर्घटनेत राजापूर - बोरिवली गाडीचा समावेश असल्याने तालुक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शोधमोहिमेचे काम त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून दिवसभर सुरूच होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता.राजापूर आगारातून सायंकाळी सुटणाऱ्या गाडीमध्ये चालक व वाहकवगळता चार प्रवासी होते. त्यामधे सोलगावचे जयेश बाणे (३६) यांचे आणि नाणारमधील मयेकर मांगर येथील बाळकृष्ण बाबल्या वरक (५२) यांचे आरक्षण होते. ते आगारात गाडीत चढले. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य दोघांनी तिकीट काढले होते. हे सर्व प्रवासी थेट मुंबईला चालले होते. त्यापैकी जयेश बाणे हे बोरिवली येथे, तर बाळकृष्ण वरक मालाडला चालले होते.ओणी तेथे अजय गुरव त्या गाडीत चढले, लांजाला दोन, सोनगिरीला दोन, असे नऊ प्रवासी या बसमध्ये होते. या गाडीला प्रवासी असतात. मात्र, मंगळवारी अमावास्या आल्याने गर्दी नव्हती. ही गाडी बी. एस. पाळोदा चालवत होते, तर एस. वाय. साखळकर वाहक होते. चिपळूणपर्यंत गाडीत नऊ प्रवासी होते, अशी माहिती राजापूर आगारप्रमुख अभिजित थोरात यांनी दिली. जयेश बाणे यांचे सख्खे बंधू शशिकांत बाणे हे शिवसेनेचे सोलगावचे शाखाप्रमुख असून, ते मंगळवारी आपल्या भावाला गाडीत बसवण्यासाठी राजापूर आगारात आले होते. बुधवारी सकाळी आपला भाऊ घरी पोहोचला का? त्यासाठी ते सतत जयेशच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. पण, त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ लागत होता. तीच परिस्थिती बाळकृष्ण वरक यांच्याही नातेवाईकांची झाली होती. (प्रतिनिधी)
दुर्घटनेचे वृत्त कळले अन् जिल्हा सुन्न झाला
By admin | Published: August 04, 2016 12:35 AM