दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या २४ तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस कोसळत आहे. तालुक्यातील विर्डी, मुळस, आयी याठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरांची पडझड होण्याचे प्रकार घडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका वीज व दूरध्वनी यंत्रणेलाही चांगलाच बसला. २४ तास तालुक्यातील विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा बंद आहे. त्यामुळे शनिवारची संपूर्ण रात्र अंधारात काढण्याची वेळ तालुकावासीयांवर आली. तालुक्यात एकूण १०६ मिमी पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. शनिवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची रिपरिप रविवारी सुरूच राहिली. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. विर्डी, आयी, मुळस या भागात झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले. विर्डी येथील राजेश सुतार यांच्या घराची भिंत कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर मुळस येथे कायतान डिसिल्वा यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. आयी याठिकाणीही घरावर झाड पडून नुकसान होण्याचा प्रकार घडला. महसूल विभागाचे कर्मचारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले होते. दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर केळीचेटेंब याठिकाणी झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर दोडामार्ग-आयी राज्यमार्गावरदेखील आकेशियाचे वाळलेले झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील झाड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. पावसाचा फटका तालुक्यातील वीज व दूरध्वनी यंत्रणेलाही बसला. इन्सुली येथून विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य ३३ केव्ही विद्युत वाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने तालुक्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शनिवारची संपूर्ण रात्र तालुकावासीयांना अंधारात काढावी लागली. हा बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरू झाला खरा, पण त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता. शनिवारी दुपारपासून तालुक्यातील दूरध्वनी यंत्रणा ठप्प झाली होती. मुख्य ओएफसी केबलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तालुक्याचा जिल्ह्याशी असलेला दूरध्वनी संपर्क तुटला होता. तो रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत सुरू झाला. (प्रतिनिधी)
दोडामार्गवासीयांची रात्र अंधारात
By admin | Published: June 21, 2015 11:43 PM