बांदा : निगुडे-मधलीवाडी (ता. सावंतवाडी) येथील ज्ञानेश्वर चंद्रकांत गावडे यांच्या बंद घरावर छापा टाकून तब्बल ५५ लाख रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला. हा गुटखा बांदा येथील व्यापारी भूषण ऊर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट (वय ५०) यांच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने रविवारी केली.आठ दिवसांपूर्वी इन्सुली डोबवाडी येथे गोदामावर छापा टाकून २२ लाखांचा गुटखा जप्त केला होता. ही कारवाई बांदा पोलिसांना अंधारात ठेवून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बांद्यात येणार असून, त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रल्हाद पाटील यांनी सांगितले.आठ दिवसांपूर्वी गोपनीय माहितीच्या आधारे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी इन्सुली डोबवाडी येथे बंद गोदामावर कारवाई करीत २२ लाखांचा गुटखा जप्त केला होता. बेकायदा गुटख्या विरोधातील ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई होती. गुटख्याचा माल हा बांद्यातील व्यापारी भूषण शिरसाट यांनी आपला असल्याचे तपासात सांगितले होते.पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या आदेशानुसारच स्थानिक गुहा अन्वेषणने निगुडे येथील कारवाई केली. गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आपले सहकारी पोलीस नाईक संतोष सावंत, अनुपकुमार खंडे, सत्यजित पाटील, स्वाती सावंत, विजय तांबे, अमित तेली यांच्यासह निगुडे मधलीवाडी येथील ज्ञानेश्वर गावडे यांच्या घरावर रविवारी सकाळी छापा टाकला. घरातील आतमधील खोलीत बेकायदा गुटख्याचे घबाड सापडले.गुन्हा अन्वेषणने छापा टाकलेल्या घराचे मालक ज्ञानेश्वर गावडे यांनी आपल्या जबाबात गुटख्याचा माल हा बांदा येथील व्यापारी भूषण शिरसाट यांचा असल्याची माहिती दिली. इन्सुली व निगुडे येथील दोन्ही कारवायांमधील मुद्देमाल हा भूषण शिरसाट यांचाच असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने शिरसाट हा बेकायदा गुटखा विक्रीचा बादशाह असल्याचे समोर आले आहे. इन्सुलीतील कारवाईनंतर शिरसाट याने बेकायदा गुटख्याचा मुद्देमाल निगुडे येथे लपवून ठेवला होता.कारवाईची माहिती मिळताच रविवारी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी बांदा पोलीस ठाण्यात भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. तसेच तपासाबाबत पोलिसांना सूचना दिल्या. सिंधुदुर्गात गुटख्याची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच या दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, यांचा सखोल तपास करून भविष्यातही कारवाई करण्याचे संकेत दयानंद गवस यांनी दिले. यावेळी बांदा सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर उपस्थित होते.बंदी घातलेल्या कंपन्यांचा मुद्देमालपोलिसांनी राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुटख्याची ४७ पोती, १६ बॉक्स व १३ कापडी पिशव्या असा एकूण ५५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. कारवाई केल्यानंतर याची रितसर नोंद बांदा पोलीस ठाण्यात केली.
निगुडेत ५५ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 11:48 PM