Kudal Assembly Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार तथा भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तब्बल २० वर्षांनी निलेश राणे यांनी धनुष्यबाण हातात घेतला आहे. कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणेंची लढत विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासोबत असणार आहे. नाईक आणि राणे कुटुंबियामधील वाद हा नवीन नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. अशातच निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करत मतदानाच्या तारखेनंतर कुडाळवासियांना कोणताही त्रास होणार नाही असं म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झालं आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो. कुडाळ विधानसभा मतदारसंघात मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश आहे. वैभव नाईक हे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर निलेश राणेंचे आव्हान असणार आहे. मात्र त्याआधी वैभव नाईक सहकार्य करण्यासाठी फोनवरुन धमकावत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भातील एक पोस्ट निलेश राणेंनी केली आहे.
"मी तमाम कुडाळ मालवण वासियांना हात जोडून विनंती करतो, मला खात्री आहे आमदार नाईकांनी आपल्याला फोन करून त्रास द्यायला सुरु केला आहे. पण आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा, नंतर कधीच आपल्या कसलाही त्रास मी होऊ देणार नाही. व्यावसायिकांना, अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या घटकांना फोन करून मला भेटून जा नाहीतर मी बघून घेईन हे सध्या उपक्रम नाईक यांचे सुरु आहे. कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी दिली जात आहे, जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहेत. म्हणून मी अगोदर म्हणालो फक्त २० तारखे पर्यंत सहन करा," असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि राणे पिता पुत्रांमध्ये मोठा वाद आहे. २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा वैभव नाईक यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काढला. २०१४ मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. या निवडणुकीत वैभव नाईक यांना ७०५८२ मते, तर राणे यांना ६०२०६ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्येही नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या रणजीत देसाईंचा वैभव नाईकांनी पराभव केला होता.
दुसरीकडे, गेल्या तीन वर्षांपासून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात माजी खासदार निलेश राणे निवडणुकीची तयारी करत होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २६ हजार २३६ इतके मताधिक्य मिळाले होते. आता ४० हजार मताधिक्य मिळवण्याचं उद्दीष्ट ठेवलं असल्याचे निलेश राणेंनी म्हटलं आहे.