चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेसच्या संघटना वाढीला माजी खासदार नीलेश राणे हेच योग्य न्याय देऊ शकतात. दांडगा संपर्क आणि त्यांच्यामागे असलेली युवक कार्यकर्त्यांची फळी या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेस पुन्हा मजबूत होऊ शकते. मात्र, त्यासाठी जिल्हाध्यक्षपदाची धुरा नीलेश राणे यांच्याकडे देणे गरजेचे आहे. याबाबतचा निर्णय घेतल्यास कॉँग्रेसला सुगीचे दिवस येतील. त्यामुळे जिल्ह्यात कॉँग्रेस वाढवायची असेल तर माजी खासदार नीलेश राणे यांच्या हाती सूत्र द्या, अशी मागणी कॉँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण खेतले यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.माजी खासदार नीलेश राणे हेच रत्नागिरी जिल्ह्यात कॉँग्रेस संघटना बांधणीसाठी सक्षम नेतृत्व आहे. गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा कॉँग्रेस सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व दिसून येत नाही. प्रांतिकच्या नेत्यांनीदेखील रत्नागिरी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठीच सबळ नेतृत्वाची गरज आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यास जिल्ह्यात कॉँग्रेस भरारी घेऊ शकते. कारण त्यांच्याकडे सामाजिक, राजकीय, सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिकरण अशा सर्वच क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाची जबाबदारी दिल्यास पक्षाला चांगले दिवस येतील. यावर पक्षश्रेष्ठींची गंभीर विचार करायला हवा.याआधी रत्नागिरी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पी. के. सावंत, श्यामराव पेजे, केशवराव राणे, भाई सावंत, टी. के. शेट्ये, लक्ष्मणराव हातणकर आणि माजी खासदार गोविंदराव निकम अशा उत्तुंग व्यक्तींनी भूषवले आहे. नीलेश राणे हेदेखील माजी खासदार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वाची सूत्रे भविष्यात त्यांच्याकडेच द्यायला हवीत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मोठी मते घेतली आहेत. सर्वदृष्टीने एक सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सातत्याने जिल्ह्याशी असणारा त्यांचा संपर्क, त्यांच्यामागे असणारी युवकांची फळी आणि प्रत्येक तालुक्यातील संघटनेशी त्यांचा असणारा संपर्क या जोरावर ते कॉँग्रेसचे संघटन चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतील आणि जिल्ह्यात कॉँग्रेस जोमाने काम करु शकेल. जिल्ह्यातील कॉँगे्रस कार्यकर्त्यांचे माजी खासदार नीलेश राणे हे स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीची निवड झाल्यास जिल्ह्यात कॉँग्रेस नव्याने भरारी घेईल. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते आहेत. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कॉँग्रेस संघटनेबरोबरच राज्यातदेखील ते कॉँग्रेस उभी करू शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे नीलेश राणे यांच्या हातात जिल्हा कॉँग्रेसची सूत्र दिल्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आत्मविश्वास व काम करण्यास उर्जा मिळेल, असा विश्वास खेतले यांनी व्यक्त केला आहे. पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)दांडगा संपर्क, मागे युवक कार्यकर्त्यांची फळी.जिल्हाध्यक्षपदाची धुरा नीलेश राणेंकडे देणे गरजेचे.जिल्हा काँग्रेस सक्षम नेतृत्वाच्या प्रतीक्षेत.कार्यकर्त्यांना आत्मविश्वास, काम करण्याची ऊर्जा मिळेल.
नीलेश राणेंच्याच हाती सूत्र द्यालक्ष्मण खेतले :
By admin | Published: December 25, 2015 10:46 PM