बांदा : झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईत ८ लाख ७१ हजार ४४० रुपयांच्या दारुसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुकीसाठी शंकर ठुंबरे, (रा. वैश्यवाडा, सावंतवाडी) याच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक ैशैलेंद्र चव्हाण यांना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार चव्हाण यांच्यासह सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, रमेश चांदुरे, संदीप कदम यांनी झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली-कोठावळेबांध येथे सापळा रचला.
शनिवारी रात्री उशिरा गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारा टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला. टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या दारुचे विविध ब्रँडचे १३५ खोके आढळले. ८ लाख ७१ हजार ४४० रुपये किमतीची दारू व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचा अधिक तपास निरीक्षक शैलेंद्र चव्हाण करीत आहेत.