सावंतवाडी, दि. 18 - अखिल भारतीय काँग्रेसने सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर प्रथमच काँग्रेस ज्येष्ठ नेते नारायण राणे सिंधुदुर्गात आज दाखल होणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचे गोवा येथील विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर ते जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवाय, कुडाळमध्ये समर्थकांना संबोधितदेखील करणार आहेत. दरम्यान, नारायण राणे भाषणादरम्यान काय बोलणार आहेत? महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करणार आहेत का? याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नारायण राणे यांचे समर्थक गोव्याकडे रवाना झाले आहेत. बांदा येथे राणे जोरदार शक्तीपदर्शन करणार आहेत.
काँग्रेसची सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांचा संभाव्य भाजपा प्रवेश गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी अखेर काँग्रेसनं शनिवारी (16 सप्टेंबर) बरखास्त केली. काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे सदस्य आणि निष्ठावंत विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांनी मुंबईत केली. उर्वरित कार्यकारिणीचे पुनर्गठण हे येत्या 15 दिवसांत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होणार याची चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होती. आठवड्यापूर्वी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे नेते जिल्ह्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले हेते तसेच ही बैठक हायजॅकही केली होती. याबाबतचा अहवाल खासदार दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसला पाठवला होता. याबाबत शनिवारी प्रदेश काँग्रेसची बैठक झाली.
या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच सिंधुदुर्ग काँग्रेस अध्यक्षाविना राहू नये, यासाठी तातडीनं जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नेमणूक करण्यात आली. असेही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी सांगितले.
सावंतवाडीतील बैठकीची अहवाल प्राप्त - अशोक चव्हाण
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसंच विकास सावंत यांची नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूकही करण्यात आली आहे. आम्हाला सावंतवाडीतील बैठकीचा अहवाल प्राप्त झाला आहे, असे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
राणे यांना धक्का
हा निर्णय म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. राणे यांच्या भाजपा प्रवेशापूर्वी काँग्रेसच्यावतीनं उचललेले हे पाऊस असून, सिंधुदुर्गात राणे समर्थकांनी राणए यांनाच मानणा-यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली जाईल, असे जाहीर केले होते. गणेश चतुर्थीच्या काळात जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बॅनवरुन काँग्रेसच्या पंजाचे चिन्ह गायब झाले होते. प्रदेश काँग्रेसकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसच्या सभासद नोंदणीसाठी सहा हजार पुस्तकं पाठवण्यात आली होती. परंतु ती सभासदांकडे दिली नाहीत. याची गंभीर दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
दस-यापूर्वी सीमोल्लंघन, ‘त्यांना’ जागा दाखवून देईन - नारायण राणे
पक्षप्रवेशावेळी दिलेले एकही आश्वासन काँग्रेसने पाळले नाही. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची कारवाई करण्यात आली. जी मंडळी या कारवाया करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच येत्या नवरात्रीतच या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी रविवारी स्पष्ट केले.राणे यांची भाजपाशी वाढलेली जवळीक लक्षात घेत; काँग्रेसने राणे समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे निष्ठावंत विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली. या निर्णयामुळे संतप्त झालेले राणे म्हणाले, कोणतीही माहिती न देता ही नेमणूक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे हे षड्यंत्र आहे. या दोघांनी काँग्रेस संपवायचे काम चालविले आहे. सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व सत्ता काँग्रेसकडे आहे. राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असणारा सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. ज्यांनी ही सत्ता मिळवून दिली अशा पदाधिका-यांना घरी बसविण्याचे काम काँग्रेसने केल्याचा आरोप राणे यांनी केला.