सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरे, गोठे तसेच इतर खासगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे.
सुदैवाने कोणतीही मनुष्य व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल ५७ घरे, ७ गोठे व इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ३७ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी २४ लाख ५१ हजार एवढी आहे. चक्रीवादळामुळे नुकसानीचा आकडा एकदच वाढला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवार ३ जून रोजी सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार संपूर्ण दिवसभर या चक्रीवादळाने सिंधुदुर्गात धुमाकूळ घातला. विशेषत: किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंचीही कमालीची वाढली होती. बुधवारी सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता. मात्र, तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरांवर कोसळणे, घरांची पडझड होणे यासारख्या घटना घडल्या होत्या.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. कोणतेही जनावर या आपत्तीत दगावले नव्हते. जिल्हा प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्यांचे नुकसान ४ लाख २६ हजार ७०० एवढे आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या ३७ एवढी असून त्यांचे नुकसान पाच लाख ५६ हजार एवढे आहे. अंशत: पडलेल्या कच्च्या घरांची संख्या अठरा असून त्यांच्या नुकसानीची आकडेवारी २ लाख २६ हजार १०४ एवढी आहे. या वादळामुळे ७ गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यांचे नुकसान ४२ हजार ४८० एवढे आहे.एका दुकानाची पडझड होऊन ५ हजारांचे नुकसान झाले आहे. मत्स्य व बंद विभागांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचेही नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे तसेच बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील प्रवेशद्वाराचे नुकसान झाले असून अशा ७ घटनांमधून २४ लाख ५१ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे.लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरजसिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही ३७ लाखांपेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.भात किंवा अन्य शेतीला फटका नाहीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत.