शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर दोन दिवस विश्रांती घेणार असल्याचे जाहीर करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे अचानक गोव्यात दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला हजर झाले आहेत.
नितेश राणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत मागच्या रांगेत बसले होते. परंतू व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तेथूनच त्यांना पाहून तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना राणेंना पहिल्या रांगेत बसवायला सांगितले. यानंतर नितेश राणेंना अन्य आमदारांसोबत पहिल्या रांगेत बसविण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची आज जामीनावर सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नितेश राणेंना राजकीय आजार झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या शस्त्रक्रियेबाबतच्या मुद्द्यावर विधान करुन खळबळ उडवून दिली. "प्रश्न तर आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का?", असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.
यानंतर आपल्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. "मला आजही त्रास होतोय, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार आहे. मणका, पाठीचा त्रास, शुगर लो होत आहे. त्यावर उपचार घेणार आहे. आताच माझं बीपी तपासून पाहिलं तर ते १५२ इतकं आहे,'' असे ते म्हणाले. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोवा निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी होती मात्र तेथेही मी जावू शकलो नाही. त्यामुळे तब्येत सांभाळून मी कामाला लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र, दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगत नितेश राणे यांनी थेट गोवा गाठल्याने चर्चांना उधान आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात गोव्यातील म्हापसा येथे सभा होणार आहे. उत्तर गोव्यातील १९ मतदारसंघांसाठी ही सभा असणार आहे.