जामिन मिळाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आपण दोन दिवस आराम करणार असल्याचे सांगितले होते. परंतू, थोड्या वेळातच ते गोव्यात नरेंद्र मोदींच्या सभेला पोहोचल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. नरेंद्र मोदींची सभा संपल्यावर नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी शिवसैनिक हल्ला प्रकरण, अटक या घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नितेश राणे म्हापशातील मोदींच्या सभेला गेले होते. यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत शेवटच्या रांगेत बसले होते. हे व्यासपीठावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले आणि तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना नितेश राणेंना पहिल्या रांगेत बसविण्यास सांगितले. यानंतर राणे अन्य आमदारांसोबत पहिल्या रांगेत बसले होते. मोदींची सभा संपल्यावर नितेश राणेंनी फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी फडणवीस यांनी हस्तांदोलन करत नितेश राणेंना ऑल दी बेस्ट म्हटले. यावर नितेश राणेंनी त्यांना काही वेळ बोलायचे आहे असे सांगितले. यावर फडणवीस यांनी तिथेच एका खोलीत बंद दाराआड नितेश राणेंसोबत चर्चा केली. या चर्चेत पोलीस कारवाई, प्रकृती आणि शिवसैनिक हल्ला प्रकरणी न्यायालयीन कार्यवाही यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
या भेटीबद्दल नितेश राणे म्हणाले, या प्रकरणात फडणवीस आमच्यासोबत उभे होते. यामुळे त्यांना भेटणे हे माझे कर्तव्य होते. त्याचबरोबर मोदींची सभा असल्याने मी कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित होतो. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेय की, काळ सर्वांना उत्तर देईल.