ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 19 - दक्षता समितीच्या बैठकीत सदस्य आपल्या भागातील समस्या मांडत असतात. काही प्रश्न पुन्हा सभेत उपस्थित होत आहेत. याचा अर्थ तहसिलदार या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्ही दुसऱ्यांनाच पुढे करता. या पुढच्या बैठकांमध्ये माहीती घेतल्याशिवाय येवु नका. अगोदर अधिकाऱ्यांसोबत आढावा घ्या, अशा शब्दात कणकवली तहसिलदार गणेश महाडीक यांना आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी खडसावले.
कणकवली तालुका दक्षता समितीची बैठक तहसिलदार दालनात आमदार नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, तहसिलदार गणेश महाडीक, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, सदस्य तन्वी मोदी, शामल म्हाडगुत, विशाल हर्णे, गणेश पाताडे यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
उज्वला गॅस योजनेतील लाभार्थी यादीत असलेला गोंधळ कायम आहे. मागच्या दोन बैठकांमध्ये या यादी बनविणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधीला बोलवुन घ्या, अशी सुचना केली असतानादेखील दुर्लक्ष का करण्यात आला ? उज्वला गॅस जोडणी देणारी यंत्रणा कुठली आहे? याची माहीती सर्वांना झाली पाहीजे अशी सुचना आमदार राणे यांनी तहसिलदारांना यावेळी केली.
या बैठकीत केरोसीन सर्वच रेशनकार्ड धारकांना मिळावे अशी मागणी तन्वी मोदी यांनी केली. त्यानुसार केरोसिन हा सर्वसामान्यांना गरजेचा विषय आहे. त्यामुळे सर्वांना केरोसिन पुरवठा व्हावा असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
फोंडाघाट गोडावुन येथे पोलीसांची गस्त व्हावी यासाठी पत्र देवुनही पोलीसांनी दुर्लक्ष केल्याचे पुरवठा विभागाने सांगितले. त्यावेळी आमदार राणे यांनी विचारणा केली . पोलीस निरिक्षकांनी गोडावुन असलेल्या ठिकाणी नोंदवही ठेवावी आमचे गस्त घालणारे पथक त्याठिकाणी सही करेल असे आश्वासन दिले.
फोंडाघाट गोडावुन दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. जुनपर्यंत हे काम मार्गी लागेल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या बैठकीत जीवनावश्यक वस्तु रेशनधान्य दुकानांवर शासनाने पुरवठा केल्यास धान्य दुकानदारांना मदत होईल. त्यादृष्टीने या बैठकीत ठराव घ्यावा अशी मागणी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली.
बायोमॅट्रीक प्रणालीला विरोध!
रास्त धान्य दुकाने शासनाच्या निर्देशानुसार बायोमॅट्रीक प्रणालीने जोडण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. या प्रणालीला धान्य दुकानदारांचा विरोध आहे. त्याचबरोबर कणकवली तालुका हा ग्रामीण भागात वसलेला असुन अद्यापही भौगोलिक परिस्थिती पाहता इंटरनेटची व्यवस्था चांगली नाही. त्याचबरोबर उदरनिर्वाहच्या साधनासाठी तरुण मुले गावाबाहेर असतात. त्यामुळे कर्तापुरुष म्हणुन वयोवृद्ध अनेक नागरिक आहेत. त्याचा विचार करता त्यांना बायोमॅट्रीकची सक्ती केल्यास अडचणीचे होणार आहे. त्यामुळे सरसकट बायोमॅट्रीक प्रणाली राबवु नका ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच बायोमॅट्रीक प्रणाली द्या, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
कणकवली दक्षता समितीच्या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भाग्यलक्ष्मी साटम, तहसिलदार गणेश महाडीक, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, सदस्य तन्वी मोदी, शामल म्हाडगुत आदी उपस्थित होते.