सिंधुदुर्ग/ सावंतवाडी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी, सावंतवाडी पोलिस ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. राणे यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले आहे. त्यानंतर, नितेश राणेंचा तुरुंगात पुस्तक वाचतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो जुना असल्याची माहिती समोर आली आहे.
नितेश राणेंना अटक केल्यानंतर पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीतील सर्व व्यवस्थेची पाहाणी केली. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे जेवण व्यवस्था बघितली जाईल असेही सांगितले. तसेच राणेंसमवेत जिल्हा मुख्यालयातील पोलीस पथक पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून आहे. राणेंच्या अटकेनंतर सध्या त्यांचा पुस्तक वाचतानाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोची सत्यकथा समोर आली आहे. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर राडा केला होता. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावेळचा साधारणत: 5 वर्षांपूर्वीचा हा फोटो असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो लेटेस्ट फोटो म्हणून व्हायरल होत आहे.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांना सावंतवाडीत आणणार असे समजताच भाजपा कार्यकर्ते ही सावंतवाडीत दाखल झाले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी याच्यासह महेश सारंग महेश धुरी, संतोष गावस आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शांततेत पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते.