कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री, डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे. मात्र, केंद्र आणि राज्यात आमदार नितेश राणेंचा पक्ष सत्तेत असताना देखील त्याबाबत ठोस निर्णय होवू शकत नाही. खासगी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात १२ कर्मचारी देऊन नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, अशी टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.तसेच पुढील काळात युवा सेना सरकारला जाग आणण्यासाठी कणकवली विधानसभा मतदार संघातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवेबाबत आढावा घेण्यासाठी धडक देणार असल्याचा इशाराही दिला. कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेनेचे विधानसभा संघटक राजू राठोड, सचिन आचरेकर, भोगले, फोंडाघाट विभागप्रमुख सिद्धेश राणे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.सुशांत नाईक म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, तापाचे, साथ रोगांचे रुग्ण तपासणीसाठी येतात. मात्र, त्या रुग्णांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी तसेच लहान मुलांच्या तपासणीनंतर उपचारासाठी यंत्र सामुग्री आवश्यक असल्याचे डॉ. धर्माधिकारी सांगत आहेत. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी आवश्यक मागणी प्रमाणे पूर्तता केली पाहिजे होती. मात्र, तसे झालेले नाही.आमदार राणे यांनी खासगी संस्थेमार्फत १२ कर्मचारी का दिले आहेत? राज्यात शासन त्यांचे आहे. मग कायमस्वरूपी कर्मचारी का भरले जात नाहीत. डॉ.धर्माधिकारी यांना तुमची शस्त्रक्रिया आम्हाला करायला लावू नका, अशी धमकी दिली. त्यामुळेच या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर येत नाहीत असा आरोप नाईक यांनी यावेळी केला.वायफाय जोडणी जनता शोधत आहेनितेश राणेंनी सुरु केलेली वायफाय जोडणी, कणकवलीची जनता शोधत आहे. औषध आपल्या दारी, स्कुबा डायव्हिंग असे प्रकल्प आमदारांनी आणले होते. ते कुठे आहेत? आता रुग्णालयात आलेले खासगी कर्मचारी किती दिवस राहणार आहेत? असा सवालही सुशांत नाईक यांनी यावेळी केला.
नितेश राणेंनी जनतेची फसवणूक थांबवावी, सुशांत नाईकांची टीका
By सुधीर राणे | Published: July 11, 2023 3:46 PM