सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल. राष्ट्रवादीशी युती झाली तरी तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसची नियोजन बैठक ओरोस येथे पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार तथा जिल्हा प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, काका कुडाळकर, सोमनाथ टोमके, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.राजन भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. त्याने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला तरी येथील तिन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल. तसे उपस्थित कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ठरविले जाईल. तिन्ही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी संख्या फार मोठी आहे. केंद्रीय समिती यावर निर्णय घेणार आहे.
काँग्रेसने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनी निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन प्रचार यंत्रणा राबविणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा आमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी भोसले यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे यांनी ह्यहातह्ण निशाणी मिळविण्याचा खूप प्रयत्न केला होता, असा आरोपही राजन भोसले यांनी केला आहे. नीतेश राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत? असे विचारले असता भोसले यांनी त्यांनी काँग्रेस कधीच सोडली, असे सांगितले. तसेच पक्षांतर्गत कारवाई करून त्यांना मोठे का करावे ? तसेच त्यांना आम्ही पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलवित नाही, असे भोसले यांनी सांगितले.
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष भाजपचे खासदार आहेत. तरी भाजपचे ते ऐकत नाहीत. आमदार राणे काँग्रेसचे आमदार असताना काँग्रेसचे ऐकत नाहीत. त्यांचे नेमके धोरणच स्पष्ट होत नाही, असा टोलाही यावेळी भोसले यांनी लगावला.२८८ जागांवर आघाडी होणारयावेळी भोसले म्हणाले, शिवसेना-भाजपसह स्वाभिमानला मत म्हणजे मोदी-फडणवीस यांना मत असे आम्ही मतदारांना समजावून सांगणार आहोत. महाराष्ट्रातील २८८ जागांवर आघाडी होईल. त्यात राष्ट्रवादीला अन्य जिल्ह्यात जागा जास्त मिळतील. सिंधुदुर्गातच जागा मिळाली पाहिजे, असा नियम नाही, असेही भोसले यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी सावंतवाडीमध्ये काँग्रेसला २७ हजार तर राष्ट्रवादीला ९ हजार मते मिळाली होती याकडेही भोसले यांनी लक्ष वेधले.