लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधीतही अनधिकृत पर्ससीन मासेमारी सुरू आहे. मत्स्य विभागाचे बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण नसल्याने काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत मालवण येथील मत्स्य आयुक्त कार्यालयात हंगामा केला. देवगड येथील पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आमदार राणे यांनी मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना फैलावर घेतले. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘बांगडा’ मासळीची टोपली अधिकाऱ्यांच्या टेबलावर ओतताच त्यांच्याकडून मच्छिमारांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त आमदारांनी अधिकाऱ्यांच्या अंगावरच मासळी भिरकावत प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, आमदार राणे यांनी सहायक मत्स्य आयुक्त वस्त यांना बेकायदेशीर पर्ससीननेटच्या मासेमारीवर केव्हा कारवाई करणार? असा सवाल केला. पारंपरिक मच्छिमारांचे जीवनच धोकादायक स्थितीत असताना बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. तसेच १ आॅगस्टपासूनच्या नव्या मत्स्य हंगामात समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्स दिसून आल्यास ते पेटवून दिले जातील, असा सज्जड दमही राणे यांनी भरला.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, रापण संघाचे पदाधिकारी दिलीप घारे, श्रमिक मच्छिमार संघाचे छोटू सावजी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, देवगड काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप साटम, अमोल तेली, संभाजी साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, किरण टेंबुलकर, बाळा खडपे, भाई खोबरेकर, तुषार पाळेकर, ज्ञानेश्वर खवळे, सचिन आरेकर, प्रदीप खोबरेकर, गणेश कुबल, गुरुनाथ तारी, अमोल जोशी, संदीप कांदळगावकर, प्रकाश राणे, नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, नगरसेविका ममता वराडकर, चारुशीला आढाव, चारुशीला आचरेकर, अभय कदम, महेश जावकर, संजय लुडबे, बाळू कोळंबकर, घनश्याम जोशी, कृष्णनाथ तांडेल, राजू बिडये, सूर्यकांत फणसेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.पर्ससीन मासेमारीविरोधात सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना आमदार नीतेश राणे यांनी चांगलेच फैलावर घेतले. आयुक्त वस्त यांच्याकडून कोणतीच उत्तरे न मिळाल्याने आमदार राणे चांगलेच आक्रमक बनले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून दाखविला जात असलेला शासन निर्णयच फेकून देत पारंपरिक मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्यावर केसेस दाखल झाल्या तरी त्या घेण्यास मी समर्थ आहे, असे स्पष्ट केले. यावेळी राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांचे अनेक प्रश्न मांडत अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. मालवण झाले. त्यानंतर वेंगुर्ले झाले आणि आता देवगड उद्ध्वस्त करण्याचा डाव अनधिकृत पर्ससीनधारकांनी घातला आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आम्ही देवगडात अनधिकृत पर्ससीन बोटींना समुद्रात थारा देणार नाही. आतापर्यंत केवळ इशारे देत होतो. आता भर समुद्रात कृती करून दाखविण्याची वेळ आली आहे. अनधिकृत पर्ससीनवर कारवाई न झाल्यास ते समुद्रातच पेटवून देऊ, असा इशारा राणे यांनी दिला. आयुक्तांच्या टेबलावर मासळी ओतलीपर्ससीननेट मासेमारी बंद करण्यासाठी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या टेबलावर बांगडा मासळीची टोपली ओतली. यावर आयुक्त वस्त यांनी ही मासळी पकडण्यास मी सांगितले का? असे वक्तव्य केल्याने संतप्त आमदारांनी टेबलावरील मासळी त्यांच्या अंगावर भिरकावली. मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसेल तर यापुढे आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करू,असा इशारा दिला.लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे१ आॅगस्टपासून अनधिकृत पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई केली जाईल. दंडाची रक्कम वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात येईल. अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या नौकांचा परवाना रद्द केला जाईल असे लेखी आश्वासन मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिले. त्यानंतर राणे यांनी आंदोलन मागे घेतले. नीतेश राणेंसह शंभरजणांवर गुन्हा पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेत आमदार नीतेश राणे यांनी सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर बांगडा मासळी फेकल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन मच्छिमारांना अभय देत मत्स्य अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप आमदार राणे यांनी करत मत्स्य आयुक्तांवर मासळी फेकली होती. मत्स्य आयुक्तांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजप मच्छिमार सेलचे रविकिरण तोरसकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाई मांजरेकर, छोटू सावजी, दिलीप घारे यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.
नीतेश राणेंनी फेकली अधिकाऱ्यांवर ‘मासळी’
By admin | Published: July 06, 2017 11:45 PM