मंदार गोयथळे - असगोलीकोकण कृषी विद्यापीठामधून मिळालेल्या प्रशिक्षणातून ‘मँगो बॅगिंग’ पद्धतीचा वापर पहिल्या वर्षी आपल्या बागेतील आंब्याच्या एका झाडावर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार झाडावर आलेल्या ४५० पैकी सरासरी २०० कैऱ्यांना कागदी पेपरच्या पिशव्या गुंडाळून बॅगिंग केले. जेव्हा या कैरीचे तयार आंब्यात रुपांतर झाले तेव्हा ते फळ खाली उतरवून पिकवले असता ‘बँगिग’ केलेल्या आंब्याचे फळ इतर आंब्यांपेक्षा पिवळे धम्मक व अधिक रसाळ असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय ‘बॅगिंग’ केल्यामुळे झाडावरील एकही फळ वानरांच्या नजरेस न पडल्याने आंब्याचे आपोआप संरक्षण झाले. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या ‘बॅगिंग’चा प्रयोग आंब्याचे संरक्षण, दर्जा व चव टिकवण्यासाठी खरोखरच उपयोगी पडल्याचे मत असगोलीमधील प्रगतशील बागायतदार नित्यानंद झगडे यांनी व्यक्त केले.गुहागर नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या असगोली या भागात नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेमध्ये आंब्यांची शेकडो कलमे लावली आहेत. यावर्षीच्या हंंगामासाठी डिसेंबर २०१४मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदारांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्या आंबा छाटणी व अन्य विषयाच्या प्रशिक्षणात बागायतदारांना ‘मँगो बॅगिंग’ ही नवीन पद्धत अवलंबण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार नित्यानंद झगडे यांनी आपल्या बागेतील एका झाडावर हा प्रयोग करण्याचे निश्चित केले. यापूर्वीच झगडे यांनी आपल्या आबा कलमांची उंची १० ते ११ फुटांवर छाटणी करुन घेतल्याने त्यांना ‘मँगो बॅगिंग’ची नवीन पद्धत राबविणे अधिक सोपे गेले. साधारण अर्ध्या फुटाच्या पेपरच्या कागदी पिशव्या तयार करुन त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले. मधमाशी व इतर कीड लागणाऱ्या कीटकांपासून व फळांचे रक्षण झाले. तसेच मुख्य म्हणजे फळ तयार होत असताना ते कागदी पिशवीमुळे वानर व माकडांच्या नजरेत न आल्याने त्या फळाचे आपोआप संरक्षण झाल्याचा मोठा फायदा या नव्या पद्धतीमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.जेव्हा आंब्याचे ५० टक्के फळ तयार झाल्याचे लक्षात आले तेव्हा पुन्हा हाताने सर्व तयार आंबे पिकण्याच्या प्रक्रियेसाठी खाली उतरविण्यात आले. उतरविल्यानंतर साधारणत: ८ ते १० दिवसानंतर जेव्हा ते फळ पिकले तेव्हा त्यांचा रंग इतर सर्वसाधारण आंब्यापेक्षा अधिक पिवळा धम्मक असल्याचे व फळ कापून खाल्ले असता अधिक गोड व रसाळ असल्याचे अनुभवायला मिळाले. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्यावतीने प्रगतशील व बागायतदारांसाठी मार्गदर्शन करण्यात आलेली ‘मँगो बॅगिंग’ची पद्धत हापूस आंब्याच्या संरक्षण, त्यांना आकर्षक व अधिक रसाळ बनवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. असगोलीतील शेतकऱ्याने नव्या उपक्रमासाठी संशोधन केले व त्यातून कोकणातील आंबा उत्पादकांसाठी त्याचा कसा फायदा करून घेता येईल याबाबत विचार केला. त्याच्या नव्या प्रयोगातून फळाची संख्या व चव यातील परिणाम सकारात्मक असल्याचे सिध्द जाले आहे.
नित्यानंद झगडे यांचा पिशवीतला आंबा
By admin | Published: June 07, 2015 11:52 PM