कणकवली : जिल्हा बँकेच्या गाडीत प्रचार साहित्य टाकून बँक कर्मचारी आणि जिल्हा बँकेची बदनामी करण्याचा डाव आमदार नितेश राणे यांनी आखला आहे, असा आरोप शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केला.
नितेश राणे यांचे अंगरक्षक आणि पी. ए. राकेश परब यांनी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवली. ड्रायव्हरला खाली उतरून गाडीचा ताबा घेतला आणि ही गाडी बँक कर्मचार्यांसह भुईबावडा पोलिस स्थानकात जबरदस्तीने नेली. मात्र अशा प्रकारांना आम्ही घाबरणार नाही. माझी लढाई सर्वसामान्यांसाठी आणि नितेश राणे यांच्या दडपशाही विरोधात आहे, असे सावंत म्हणाले.
सतीश सावंत यांनी आज आपल्या कलमठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जिल्हा बँकेचे कर्मचारी आपल्या नियमित कामासाठी वैभववाडी भुईबावडा परिसरात गेले होते. यावेळी आमदार नितेश राणे यांचे अंगरक्षक राकेश परब यांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी अडवली.
प्रचाराबाबतची काही कागदपत्रे देखील त्यांनी गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हरला धक्काबुक्की करून आतील कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने गाडीसह राबडा पोलीस स्थानकात नेले हा सर्व प्रकार म्हणजे नितेश राणे यांची दडपशाही आहे.
बँक कर्मचारी सुट्टी टाकून प्रचार करू शकतात तसेच त्यांना काही तक्रारी करायच्या असेल तर निवडणूक आयोगाकडे करायला हव्या होत्या बँक कर्मचाऱ्यांना थेट पोलिस स्थानकात देणे हे चुकीचे आहे. याबाबत बँक कर्मचारी आपल्या कर्मचारी संघटनेमार्फत निश्चितच आवाज उठवतील.
सावंत म्हणाले, या पूर्वीच्या अनेक निवडणुकांत जिल्हा बँकेची मदत राणे यांना चालत होती, मग आत्ताच बँकेचे कर्मचारी त्यांच्या डोळ्यात का खुपतात? तसेच मुंबई बँकेचे अध्यक्ष त्यांना प्रचारासाठी चालतात तर मग जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा न्याय का लावत आहेत? आमची लढाई सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आहे तसेच नितेश राणे यांच्या दडपशाही विरोधात आहे आणि या लढाईत आम्ही निश्चितच यशस्वी होऊ असेही सावंत म्हणाले.