कणकवली : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीच्यावतीने निवडणूक लढवून शिवसेना सचिव विनायक राऊत खासदार झाले. पण गेल्या पाच वर्षात त्यांनी विकासकामांमध्ये भाजपाला सापत्नपणाची वागणूक दिली आहे. तसेच भाजपा पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतलेले नाही . त्यामुळे आपल्यावर पक्ष कारवाई झाली तरी बेहत्तर. पण, आगामी निवडणुकीत विनायक राऊतांचा प्रचार करणार नाही, अशी रोखठोक भूमिका अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी भाजप संपर्क मंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर मांडत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.दरम्यान , नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला विजयी करायचे आहे. असे सांगतानाच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे युतीचा धर्म पाळण्याचे निर्देश कार्यकर्त्याना दिले. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत निश्चितच पोचविणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक झाली.
यावेळी आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराणे , स्नेहा कुबल, राजश्री धुमाळे, प्रमोद रावराणे , अभिषेक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल असलेले आपले मत मांडले. शिवसेना - भाजप युतीचे स्वागत करतानाच खासदार राऊत यांच्या उमेदवारीस अनेकांनी विरोध केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेबाबतचा असंतोष व्यक्त केला.भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, शिशिर परुळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना विनायक राऊत यांचा प्रचार कोणत्याही परिस्थितीत करणार नसल्याचे जाहीर केले.२०१४ मध्ये राऊत यांच्या विजयासाठी आम्ही कार्यकर्त्यानी अथक मेहनत घेतली होती. पण त्याची जाण शिवसेना नेत्यांना नाही. त्यामुळे यावेळी घरात बसू . पण विनायक राऊत यांचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आमच्यावर पक्षाने कारवाई केली तरी बेहत्तर अशा संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.विनायक राऊत यांनी मागील ५ वर्षांत भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना डावलण्याचेच काम केले आहे. शिवसेना आयोजित मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या उदघाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचाच साधा फोटोही लावला जात नाही . शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. हा माज उतरवण्यासाठी लोकसभेला भाजपाचाच उमेदवार हवा.सुरेश प्रभू किंवा रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरावे. विधानसभा निवडणुकीत जरी युती झाली असली तरी जिल्ह्यातील २ मतदारसंघ भाजपाला मिळावेत, अशी आग्रही मागणी अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी केली.तर या लोकसभा निवडणुकीत १० लाखाहून अधिक मतदान होईल. मात्र, भाजपा कार्यकर्ते ज्याचे काम करतील तोच उमेदवार रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार असेल. त्यामुळे भाजपा कार्यकर्तेच खासदार ठरवणार आहेत.असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला .संघटनमंत्री सतीश धोंड यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे कान उपटले. ते म्हणाले , कोकणचे प्रश्न मांडण्यासाठी राज्य कोअर कमिटीत आहे कोण ? ठाणे, पालघरची जागा सेनेला सोडण्यात आली. कोकणात आम्ही अन्याय सहन केला म्हणून सेनेने आमच्यावर अन्याय केला. याला आमचे पदाधिकारी जबाबदार आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने विनायक राऊत सक्षम खासदार आहेत. कोकणावर अन्याय होता नये हे सांगणारे सक्षम नेतृत्व भाजपात तयार व्हायला हवे. त्यासाठी प्रयत्न करा. असे धोंड यांनी सुनावले. दरम्यान, या बैठकीच्यावेळी प्रसार माध्यमांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे अधिक माहिती समजू शकली नाही.आमदार लाड यांच्याकडून मनधरणी.!सिंधुदुर्गात भाजपाची ताकद वाढते आहे. शिवसेनेबद्दलचा जो राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. तोच माझ्याही मनात आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्गात पालकमंत्री शिवसेनेचेच आहेत. साहजिकच याचा फटका भाजपाला बसला आहे. यापुढे दोन्ही जिल्ह्यांना भरीव विकासनिधीची तरतूद भाजपच्या माध्यमातून होईल. देशात २३ पक्षांचे महागठबंधन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेशी युती करण्याबाबत केंद्रातून आदेश आले होते.प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार राऊत यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आम्हाला जठारांसारखा कार्यकर्ता घेऊनच पक्षाचे काम पुढे न्यायचे आहे.पक्षाला सिंधुदुर्ग - रत्नागिरी नव्हे तर राज्यातील अन्य ४७ लोकसभा मतदारसंघांचा विचार करावा लागतो. मात्र, विनायक राऊत यांच्या प्रचाराआधी शिवसेनेसोबत लिखित करार होईल. ज्या चुका मागील ५ वर्षांत झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याबाबत त्यांच्याकडून आश्वासन घेतले जाईल. असे सांगत आमदार प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांना विश्वास देत मनधरणी करण्याचा प्रयत्न यावेळी केला.आधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक नंतर प्रचार!मुख्यमंत्र्यासोबत आमच्या सर्व कार्यकर्त्याना चर्चा करायची आहे. जोपर्यंत ही चर्चा होत नाही , तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाही, असे प्रमोद जठार यांनी या बैठकीत सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत जठार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.स्वाभिमान पक्ष मोदींच्या नावाने मागेल मतांचा जोगवा!आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व नारायण राणे हे नरेंद्र मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागतील. पण त्याला भुलू नका. भाजप कार्यकर्ता संभ्रमात राहू नये यासाठी हे मी सांगत असून मतदारांना संभ्रमात टाकू नका असे यावेळीमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.राऊतां विरोधात नाराजी कायम !जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीच्या आधी भाजपचे कोकणचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल जलतरंगमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा कोअर कमिटीच्या बैठक झाली.
या बैठकीत भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, संदेश पारकर, यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला.