सावंतवाडी : काँग्रेसवर घोडेबाजारांचा आरोप करणाऱ्यांनी दोडामार्ग पंचायत समितीच्या निवडणुकीत गाढव बाजार केला होता का? असा सवाल कॉग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला आहे. युतीकडे सक्ष्म नेतृत्व नसल्यानेच त्यांचे नगरसेवक फुटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.येथील माजी खासदार कार्यालयात भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोडामार्गचे नूतन नगराध्यक्ष संतोष नानचे याचा सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई,सभापती प्रमोद सावंत, अनिल निरवडेकर, प्रमोद गावडे, संतोष जोईल उपस्थित होते.डॉ. परूळेकर म्हणाले, दोडामार्ग मध्ये काँग्रेस आघाडीने इतिहास रचला असून युतीचे दहा नगरसेवक असतानाही युतीला विजय मिळवता आला नाही. हे दुर्देव आहे. शिवसेना व भाजपमध्ये असलेल्या भांडणामुळेच हे सर्व चित्र उभे राहिले असून काँग्रेसमध्ये विकास करण्याची क्षमता आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हे वेळोवेळी दाखवून दिले असून दोडामार्ग सरपंचपदी असताना संतोष नानचे यांनी केलेल्या कामामुळेच आज त्यांच्यावर जनतेने विश्वास टाकला आणि तो त्यांनी सार्थ ठरवला आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर हे दोडामार्गमध्ये काँग्रेसने घोडेबाजार केला, असे म्हणतात. मग पंचायत समिती निवडणूकीत तुम्ही काय केले होते. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी तर तत्वाच्या गोष्टी सांगूच नयेत. त्यांनी राष्ट्रवादी सोडताना अनेकांना आपल्या बाजूने घेतले, ते कशाच्या जीवावर हे ही सर्वांना माहीती असून आता पालकमंत्र्याचा त्यांच्याच मतदार संघातही दबदबा राहिला नाही हे सिध्द झाले आहे. दोडामार्ग मधील विजयांने पुन्हा एकदा नारायण राणे यांचे कार्य तालुक्याला अनुभवता येणार असून अनेक विकासांचे प्रकल्प नवीन नगरपालिकेत राबवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. तसेच शिवसेना व भाजपकडे जिल्हयात नेतृत्वच नाही, त्यामुळे नगरसेवक फुटले असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. (प्रतिनिधी)
सक्षम नेतृत्व नसल्यानेच नगरसेवक फुटले
By admin | Published: November 29, 2015 12:59 AM