सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आता काही झाले तरी दीपक केसरकर यांच्याशी दिलजमाई करणार नाही. ते आणि मी एकत्र आलो तर भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई निश्चित आहे, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली यांनी दिला आहे.तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे नेमके काय कान टोचले हे आताच बोलणार नाही. वेळ आल्यावर नक्कीच बोलेन. मी दोन वेळा हरलो असलो तरी पक्ष वाढवला. त्यामुळे त्याची फळे आज केसरकर चाखण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.राजन तेली यांनी मंगळवारी सावंतवाडी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केसरकर यांच्या विरोधात जोरदार टीका केली. ते म्हणाले, केसरकरांनी कायम आश्वासने देऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली. आजपर्यंत त्यांनी जाहीर केलेल्या किंवा घोषणा केलेला एकही प्रकल्प या ठिकाणी झालेला नाही.मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा चष्म्याचा कारखाना किंवा अन्य घोषणा सर्व फसव्या निघाल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्याशी दिलजमाई करून सावंतवाडी मतदारसंघ आणि मतदारसंघातील लोकांचे नुकसान होते, असा टोला त्यांनी लगावला.
आता काही झाले तरी केसरकर यांच्याशी दिलजमाई नाही, भाजपचे नेते राजन तेली यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:48 AM