बांदाः देशात कोरोनानं थैमान घातलेलं असून, अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे मुलांचं शिक्षण आणि नोकऱ्याही ऑनलाइन झाल्या आहेत. वर्क फ्रॉम होमला प्रचंड मागणी असून, अनेक जण घरातूनच काम करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यात गावातही मुलांचं शिक्षण ऑनलाइन करण्याकडे कल असतानाच अनेक गावांमध्ये अद्याप नेटवर्कच पोहोचलेलं नाही. त्यामुळे मुलांना नेटवर्कसाठी पायपीट करावी लागते आहे. अशाच दोन तरुणींनी रेंजसाठी जंगलात उंच ठिकाणी झोपडी बांधली असून, तिथूनच त्या काम करत आहेत. मोबाइलची रेंज पकडल्यानं एकीनं अभ्यासही सुरू केला. तर दुसरीची नोकरी टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे जोरदार पाऊस पडत असतानाही त्या दोघींनी आपल्या कर्तव्यात अजिबात खंड पडू दिला नाही. कोरोनाच्या संकटामुळे आता सगळीकडे ऑनलाइनला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत वर्क फ्रॉम होमकडे बऱ्याच जणांचा कल आहे. पण बऱ्याच गावात नेटवर्क नसल्यानं गावकऱ्यांची आणि मुंबईहून कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांची अडचण होत आहे. सावंतवाडीच्या तांबुळी या दुर्गम गावातील दोन तरुणींनी परिस्थितीवर मात करत डोंगरावर झोपडी बांधून अभ्यास अन् कामाला सुरुवात केली. तांबुळी-डेगवे इथल्या उंच ठिकाणी त्या झोपडी बांधून दोन महिन्यांपासून ऑनलाइन अभ्यास आणि काम करीत आहेत. एकीची शिक्षणासाठी तर दुसरीची नोकरी टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड वाखाणण्याजोगीच आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कणकवलीतील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या तरुणीनं जंगलात झोपडी बांधून अभ्यास केला आणि पाहता पाहता ती तरुणी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर प्रशासनानं तिला गावातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. तांबुळी-टेंबवाडी इथल्या हेमा सावंत आणि संस्कृती सावंत या दोघीही मुंबईतील आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रानं मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं. मुंबईत कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दोघींचं कुटुंब मुंबईतून गावी आलं. बांदा शहरापासून 12 किलोमीटरवर असलेल्या दुर्गम गावात कोणतंच नेटवर्क पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना अशी उंच जागेवर झोपडी बांधून शिक्षण आणि काम करावं लागत आहे. भारत नेट प्रकल्प मार्गी लागावा केंद्राच्या भारत नेट प्रकल्पाअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 पैकी 361 ग्रामपंचायती या फेज वनमध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतातील ग्रामीण भागही जगाशी जोडण्यात येणार आहे; मात्र ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे.