रत्नागिरी : रस्ते सुरक्षा अभियान हे एक दिवस किंवा पंधरवड्यापुरते मर्यादित न राहता वाहनचालकांनी वर्षभर पाळले तर अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी झालेले दिसेल. वाहन चालवणाऱ्या सर्वांनी वाहतूक कोंडीचे भान राखून वाहन चालविल्यास अपघात रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे सुरक्षा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सुरक्षा अभियान कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, रत्नागिरी विभागाचे नियंत्रक के. बी. देशमुख, परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक तारु, आरएसपीच्या जिल्हा समादेशक अंजली चव्हाण, पालीचे प्राचार्य जगन्नाथ विरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना काळम-पाटील म्हणाले की, मानव जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे तत्व म्हणजे मानवी अस्तित्व हे आहे. त्यामध्ये सुदृढ, सशक्त जीवन जगता आले पाहिजे. पण, सध्या आपण हेच मुख्य तत्व रस्ते अपघातांमुळे गमावत चाललो आहोत, हे धोकादायक आहे. त्याकरिता रस्त्यावर सुरक्षा बाळगणे हे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी विशेषत: रहदारीचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच एस. टी.चे देशमुख यांनी सांगितले की, सर्व शिकाऊ चालकांनी अत्यंत जबाबदारीने वाहन चालवल्यास अपघातांना आळा बसेल.यावेळी शिंदे म्हणाले की, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांनी वाहनावर आपल्या प्रिय व्यक्तीसारखे प्रेम करायला शिकले पाहिजे. त्याची योग्य देखभालही राखणे महत्त्वाचे आहे.यावेळी लांजा, पाली, संगमेश्वर येथील महामार्गांवर भरणारे आठवडा बाजार अन्यत्र हलविणार असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना पाली हायस्कूलच्या आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्था याविषयी प्रात्यक्षिके दाखविली. आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)सर्व अवैध प्रवासी वाहतूक बंद करणार. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर जर दोनपेक्षा जास्त गंभीर अपघातांची नोंद असल्यास परमीट रद्द.पाच वर्षांमध्ये प्राणांतिक अपघात करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलीस, परिवहन विभाग शिफारस करणार.पुढील १० दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पोलिसांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा उपक्रम व्यापकपणे राबविणार.
रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्यापुरते नको; वर्षभर हवे
By admin | Published: January 19, 2015 11:04 PM