कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नारूर येथील कातकरी समाजाच्या वनौषधी मध उत्पादन व्यवसायाला सजग नागरिक मंचाने ऊर्जितावस्था दिली आहे. या मधोत्पादनाचे ‘फॉरेस्ट हनी’ असे नामकरण करण्यात आले असून, कुडाळ येथे या उत्पादनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. सजग नागरिक मंचाच्या या उपक्रमामुळे कातकरी समाजाला आर्थिक सुबत्ता मिळण्याची आशा वाढली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्य करणारे आणि पूर्णत: निसर्गावरच अवलंबून असणारा कातकरी समाज पांरपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मोठ्या प्रमाणात मध गोळा करतो. या नैसर्गिक मधामध्ये वनौषधी गुणधर्म असतात. मात्र, या मधाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. जिल्ह्यातील आणि बाहेरील व्यापारी हा मध कमी दरात खरेदी करतात. त्यामुळे येथील कातकरी समाज अर्थाजर्नाने कमकुवतच आहे. या समाजाने गोळा केलेल्या औषधी मधाला बाजारात चांगली किंमत मिळावी, तसचे त्यातून त्यांना चांगले अर्थार्जन व्हावे, यासाठी सजग नागरिक मंचच्या अॅड. सुहास सावंत, सचिन देसाई, मोहम्मद शेख, अॅड. समीर कुलकर्णी, कार्यकर्त्यांनी या कातकरी समाजाशी बोलून या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यानंतर कातकरी समाजाच्या सहकार्यातून त्यांनी गोळा केलेल्या मधावर प्रक्रिया करून सुबक स्वरुपातील उत्पादन बाजारात आणले आहे. याकामी त्यांना पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर यांनी सहकार्य केले. कातकरी समाजाने गोळा केलेल्या मध उत्पादनाला सजग नागरिक मंचाने ‘फॉरेस्ट हनी’ असे नाव दिले आहे. या उत्पादनाचा उद्घाटन समारंभ येथील मराठा समाज सभागृहात अॅड. अजित भणगे, कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे डॉ. विजय साठे, कुडाळचे उपसभापती आर. के. सावंत, डॉ. वंदना करंबेळकर, अॅड. सुहास सावंत यांच्या हस्ते व तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले. डॉ. वंदना करंबेळकर म्हणाल्या की, कातकरी समाज पारंपरिक पद्धतीने दंड प्रहार करून मध काढतो. त्यांनी गोळा केलेल्या मधात औषधी गुणधर्म असतात. तसेच तो त्रिदोष नाशकारकही असतो, असे सांगितले. दीपक नारकर यांनी सर्व बाजूंनी वंचित असलेला कातकरी समाज लाखो रुपयांच्या मधाचे उत्पादन करतात. परंतु,योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना कवडीमोल मोबदला मिळतो.अॅड. अजित भणगे यांनी सजग नागरिक मंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्याला राजकीय वळण लागू देऊ नका, असे आवाहन केले. यावेळी संजय पिंगुळकर, पंचायत समितीचे सदस्य दीपक नारकर, बनी नाडकर्णी, अतुल बंगे, अॅड. अमोल सामंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाज उपेक्षितयावेळी डॉ. विजय साठे म्हणाले, कातकरी समाजाकडे मातीतून सोने काढण्याची कला आहे. त्यांना निसर्गाने चांगल्या शक्ती दिल्या आहेत. नागरी समाजाला घाबरणारा हा समाज व्यसनाधीन असल्याने विकासाची पाळेमुळे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. त्यामुळे हा समाज उपेक्षितच राहिला. ही स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात १०० वर्षांनंतर हा समाज नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
‘कातकरीं’च्या वनौषधी मधाचे नामकरण
By admin | Published: April 29, 2015 9:35 PM