वैभववाडी : पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तू प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वापरून अधिकाऱ्यांनी त्यांवर हजारो रुपये उकळले. ही प्रशासकीय अनियमितता नसून तो आर्थिक अपहार आहे. त्यामुळे प्रशासकीय अनियमिततेची पळवाट काढून कुणाही अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करू नये, असे खरमरीत पत्र सभापती अक्षता डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांना पाठविले आहे.राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत १५ व १६ नोव्हेंबर २०१९ रोजी पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमावर एक लाख ३१ हजार ५२० रुपये खर्च दाखवून अपहार केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर पंचायत समितीच्या तीन सभांमध्ये त्याचे पडसाद उमटले.
त्यानंतर एकदा पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून चौकशी करण्यात आली. त्यासंदर्भातही आक्षेप नोंदविल्यानंतर चौकशी अधिकारी दीपाली पाटील यांनी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसमक्ष चौकशी केली.दरम्यान, जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत हा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी हा आर्थिक अपहार नसून प्रशासकीय अनियमितता आहे. त्याबाबत त्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
यामुळे सभापती डाफळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्वच पदाधिकारी संतप्त झाले आहेत. याबाबत सभापती डाफळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक खरमरीत पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, स्थायी समितीत केलेला खुलासा वर्तमानपत्रातील बातमीच्या माध्यमातून आमच्या वाचनात आला. हा खुलासा धक्कादायक आहे. आर्थिक अपहार आणि प्रशासकीय अनियमितता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाहीया प्रकरणात अधिकाऱ्यांनी थेट भ्रष्टाचार केला आहे. सर्वच बाबतीत अपहार आहे. परंतु, पंचायत समितीच्या मालकीच्या वस्तू वापरून खोटी बिले जोडून हजारो रुपये उकळले आहेत. असा उघड अपहार सिद्ध होत असताना जर जिल्हा प्रशासन कारवाई करणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रकार गंभीर असून आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशाराही सभापती अक्षता डाफळे यांनी पत्राद्वारे दिला आहे.अपहार करणाऱ्याविरोधात कडक कारवाईप्रशिक्षणाच्या स्टेशनरीची किंमत बाजारभावाच्या दरापेक्षा २० ते ३० पट अधिक दाखवून लूट केली असून हाही आर्थिक अपहाराच आहे. हा अपहार पचविण्याच्या हेतूने दोन जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थिती नोंदवहीत खोट्या स्वाक्षऱ्या करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी केले आहे.
हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. तरीदेखील आपण प्रशासकीय अनियमितता अशा गोंडस नावाखाली अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करून पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्याचे काम करीत आहात.या प्रकरणात थेट अपहार केल्याचे स्पष्ट झालेले असूनही अपहार करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई होणार नसेल तर अपहार केला तरी कोणतीही कारवाई होत नाही, असा संदेश समाजात जाणार आहे. त्यामुळे अपहार करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करावी.