कणकवली : राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सेलिब्रेशन’ करणार नसून भाजप सरकारने गेल्या वर्षभरात केलेली कामे ‘कम्युनिकेशन’च्या माध्यमातून पोहोचवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले. २६ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात तालुकानिहाय लोकसंवादाचे कार्यक्रम आयोजित केल्याचे काळसेकर यांनी सांगितले. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महिला जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर उपस्थित होते. काळसेकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला ३१ आॅक्टोबरला वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवून सरकार आपली वर्षपूर्ती साजरी करणार आहे. वैभववाडी, दोडामार्ग हे आचारसंहिता लागू असलेले तालुके वगळून २६ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत लोकसंवादाचे कार्यक्रम तालुका केंद्राच्या ठिकाणी होतील. लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, शेतकरी अशा विविध क्षेत्रांतील मंडळींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होतील. जिल्हा परिषद स्तरापर्यंतचे जनतेचे छोटे मेळावे आयोजित केले जातील. या कार्यक्रमांतून भाजप सरकारने केलेली कामे लोकांसमोर आणली जातील, असे सांगून काळसेकर म्हणाले, वीज पडून गावराई येथील फाले कुटुंबातील मायलेकाचा अंत झाला. दुसऱ्याच दिवशी सायंकाळी प्रत्येकी चार लाखांप्रमाणे आठ लाख रुपयांची मदत दिली आहे. गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवार योजनेवर १४०० कोटी रुपये खर्च केले. त्यातून २५ टीएमसी पाणी अडवण्यात आले. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १५ हजार कोटी रुपये खर्च करून फक्त १२ टीएमसी पाणी अडवले गेले होते. भाजप सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आता दुष्काळातही ठिकठिकाणी जलपूजनाचे कार्यक्रम होत आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबातील मालमत्ता हस्तांतरण फक्त २०० रुपयांच्या बॉँडपेपरवर आता होऊ शकते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुत्तीर्णांच्या परीक्षेचा स्वागतार्ह निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. सिंधुदुर्गात मुद्रा योजनेच्या माध्यमातून आठवडाभरात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांना वित्तपुरवठा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आश्वासनपूर्ती : तीनआकडी आमदारांची संख्या गाठलीराज्य सरकारने वर्षभरात समाजाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे काम केले आहे. मागील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. राज्याच्या गेल्या २० वर्षांच्या इतिहासात तीन आकडी आमदारांची संख्या कोणाला गाठता आली नाही. मात्र, भाजपने १२३ आमदार निवडून आणत स्वबळावर सत्ता स्थापन केली. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही फडणवीस सरकारने केली आहे, असे काळसेकर म्हणाले.३१ रोजी तावडे सिंधुदुर्गात३१ आॅक्टोबरला शिक्षणमंत्री तावडे कुणकवण येथे आपल्या गावी विकाससकामांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. यानिमित्त ठिकठिकाणी पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती काळसेकर यांनी दिली.
सेलिब्रेशन नव्हे कम्युनिकेशन
By admin | Published: October 20, 2015 9:08 PM