कणकवली : सोपे लिहिणे आवश्यक आहे, हे सूत्र मला माझ्या गुरूंकडून मिळाले. त्यामुळे कोणताही विषय सोपा करून लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. मी लिहिलेले सहज आकलन होत असल्याने वाचकांना ते आवडते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना चाकोरीबध्द राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन लेखक आणि आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले. स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘माझा लेखनप्रवास’ या विषयावर ते बोलले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नीतेश राणे, सिंधुरत्न फाऊंडेशनचे डॉ. जयेंद्र परूळेकर, डॉ. किरण गुजर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, गोडबोले यांनी आपल्या लेखनप्रवास उलगडून सांगतानाच जीवनातील चढउतारही सांगितले. मुलाला जडलेला गंभीर आजार हा आयुष्यातील कलाटणी देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. माणसाला जेव्हा कोणीही गरज भासते, तेव्हा काम करण्याची क्षमता वाढते. मुलाच्या आजारपणावर खर्च करण्यासाठी २ कोटी रूपये कसे जमा करावे, असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहिला तेव्हा सर्व पर्यायांचा शोध घेतला. अभ्यास आणि वाचनातून मी घडत गेलो. प्रत्येक गोष्ट मनापासून शिकत गेलो. त्यावर प्रेम करत समजून घेत गेलो. यानंतर एक वेळ अशी आली की लिहावे, अशी जाणीव झाली. विश्वाची निर्मिती, पृथ्वी, विज्ञान, अर्थशास्त्र आदी गोष्टींची मांगडणी करताना ती अधिक सोप्या पद्धतीने लोकांना आकलन होईल, अशा रितीने मांडण्याचा प्रयत्न केला. वाचकांकडून येणारा प्रतिसाद याने मी समाधानी झालो. समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर ते म्हणाले की, आता बघे जास्त झाले आहेत. मदतीचा हात देणारे कमी झाले आहेत. नक्कल करून दुसऱ्याचे गुण मिळवता येत नाहीत. मात्र, त्यापेक्षा चांगल्या गुण आत्मसात करावेत. सध्या उद्योजक होण्याकडे कल वाढला पाहिजे. भारतात संशोधनासाठी जेवढा खर्च होतो, त्याच्या सात पट खर्च जाहिरातीवर होतो. संगणकीय किंवा अन्य क्षेत्रामध्ये भारताची स्वत:ची सॉफ्टवेअर्स किंवा संशोधन नाही, यामागे हीच कारणे आहेत. जेथून ज्ञान मिळेल तेथून ते आत्मसात करावे. हे ज्ञान योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले गेले पाहिजे. या व्याख्यानमालेतून सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा मिळावी, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी) प्रवृत्ती धोकादायक : नितेश राणे आमदार नितेश राणे म्हणाले की, तरूणांना बंदुका आणि तलवारी चालविण्याचे प्रशिक्षण देऊन अन्य धर्मियांच्या विरोधात ते हत्यार वापरण्याचे प्रकार अन्य देशांत सुरू आहेत. यामागील प्रवृत्ती धोकादायक आहेत. तरूणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे, तरच तरूण पिढी वाममार्गाला जाण्याचे थांबेल, असे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.
चाकोरीबध्द नव्हे; तर वेगळा विचार करण्याला महत्व
By admin | Published: February 01, 2016 12:45 AM