कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला आहे. महामार्ग प्रश्नी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचे आदेश प्रशासन आणि ठेकेदाराने केराच्या टोपलीत टाकले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेंद्र नेरकर, संतोष सावंत उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले,महामार्ग चौपदरीकरण संदर्भात पालकमंत्री केसरकर यानी ३० जुन रोजी बैठक घेऊन महामार्गाचे काम होणार असल्याचे सांगत सर्व यंत्रणेला आपण सज्जड दम देऊन ठेकेदारावर कारवाई करणार असे वक्तव्य केले होते. तसेच मुंबई - गोवा महामार्ग पाहणीचा स्टंट करुन कणकवलीवासियांची व महामार्ग लगतच्या सर्वच प्रकल्पग्रस्तांची फसवणुक केली.
या पाहणी दौऱ्याची वृत्ते व छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि केसरकरांचे काम संपले. जे काम त्यांनी मार्च महीन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यापुर्वी करणे आवश्यक होते , त्याकडे दुर्लक्षच केले. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींची जाणीव करुन घेणे व कामाला एप्रिल-मे मध्ये सुरुवात करण्याची गरज होती. मात्र पालकमंत्र्यानी जनतेला फसविले असुन करारामध्ये खड्डे भरण्याबाबत नोंद असतानाही हे काम ठेकेदाराने केले नाही. जनतेचा झालेला उद्रेक व सर्वपक्षीयांची एकजुट या दबावामुळे कामाला सुरुवात झाली. मात्र याचेही श्रेय पालकमंत्री हेच घेत असुन जनतेची दिशाभुल आणि फसवणुक करण्याचे काम ते करत असल्याचा टोला उपरकर यानी लगावला.पालकमंत्र्यांच्या घोषणांचे काय झाले ?पालकमंत्री दीपक केसरकर यानी कणकवलीतील १ हजार बीएसएनएलचे दूरध्वनी सुरु करण्याचे आदेश दिले होते. ते सुरु झाले का ? महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सुचना केल्या होत्या. ते भरले का? असा सवाल करताना उपरकर म्हणाले, खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केसरकरांनी दिलेल्या आदेशाला प्रत्यक्षात प्रशासन व ठेकेदार यानी केराची टोपली दाखविली आहे.ते पुढे म्हणाले, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यानी खारेपाटण ते पत्रादेवी असा प्रवास गुरुवारी केला. त्यामुळे केसरकर यानी त्यांच्याकडुनच खड्ड्यांचा अहवाल घ्यावा असा उपरोधीक टोला लगावताना उपरकर म्हणाले, गेली साडेचार वर्षे जनतेचे प्रश्न सोडवु न शकलेले केसरकर हे केवळ घोषणा देण्यापुरतेच आहेत. ८०० जणांना नोकरीची त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नियुक्ती पत्रे दिला का?, सेट टॉप बॉक्स दिले का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.यावेळी पुन्हा ते गणपती विमानातुन आणणार कि प्रवाशांना आणणार असा सवाल करत आता केसरकरांचेच विसर्जन करण्याची वेळ जनतेवर आली असल्याचा टोलाही उपरकर यानी यावेळी लगावला.