सावंतवाडी : माझी स्पर्धा कुणाशी नाही. मी माझे काम करत राहणार आमदार खासदारच्या स्पर्धेत ही मी नाही. पण समाजकार्यात माझा ठसा कायम उमटवणार असल्याचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सांगितले. सावंतवाडी मतदार संघातून संधी मिळाल्यास तेव्हा बघू असे सांगत सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. मागील आठवडाभर सुरू असलेल्या विशाल पर्व कार्यक्रमाचा समारोप रविवारी पार पडला. त्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.परब म्हणाले, तुर्तास मला सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच ओळख निर्माण करायची आहे. माझी कोणाशी स्पर्धा नाही, त्यामुळे आमदारकी आणि खासदारकीच्या स्पर्धेत मध्ये मी आहे, अशी चर्चा करुन स्वतःच्या माणसांना दुखावणार नाही. माझे राजकीय भवितव्य येणारा काळ ठरवेल. मात्र येणार्या काळात पंचवीस किलोमीटरच्या परिसरात दीड हजारहून अधिक लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आणण्याचा माझा मानस असल्याचे परब यांनी सांगितले.माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमास दोन केंद्रीय आणि दोन राज्यातील मंत्र्यांसह जिल्ह्यातील पदाधिकार्यांची हजेरी लागणे हे भाग्य समजतो. या सर्वाचे आभार मानतो, तुमचे प्रेम माझ्यावर असेच ठेवा, असेही ते म्हणाले.येणार्या काळात मला सावंतवाडी पासून पंचवीस किलोमीटरच्या परिसरात एक आयटी पार्क, गोल्फ पार्क सारखा खासगी गुंतवणूक असलेला उद्योग आणायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून कसा विकास होवू शकतो हे डोळ्यासमोर ठेवून काही नियोजित कामे करायची आहेत. त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक काम करण्याबरोबर रोजगार देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. येणार्या पुढच्या वाढदिवसापुर्वी त्यातील संकल्प पुर्ण झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडीतून स्पर्धेत नाही पण आली संधी तर बघू, विशाल परब यांचे सुचक वक्तव्य
By अनंत खं.जाधव | Published: October 16, 2023 3:25 PM