रत्नागिरी : शहराजवळील मिरकरवाडा जेटी परिसरातील अनधिकृत झोपड्या हटवण्याचे आदेश प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बंदर विकासाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिरकरवाडा जेटी परिसरात शेकडो झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक झोपड्यांमध्ये मच्छिमारांचे मासेमारीचे सामान ठेवण्यात येत आहे. किनारपट्टी शेजारीच मासेमारीचे सामान ठेवणे सोयीचे ठरत असल्याने मच्छिमारांनी या झोपड्या उभारल्या आहेत. तसेच परराज्यातील कामगारांच्याही यामध्ये झोपड्या आहेत. या शेकडो अनधिकृत झोपड्या बंदर विकासासाठी अडचणीच्या ठरत आहेत. मिरकरवाडा बंदर जेटी परिसरामध्ये मच्छिमारांसाठी अनेक असुविधा असून, त्या मच्छिमारांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या बंदरामध्ये मच्छिमारांसाठी पाणी, वीज आणि इतर भौतिक सुविधा नाहीत. कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे हे राज्यातील एकमेव महत्त्वाचे बंदर असूनही विकासापासून अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले. गाळाची समस्या सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने दिलेला सक्शन ड्रेझर बंद अवस्थेत पडून आहे. मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत झोपड्यांवर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांनी बुलडोझर फिरवला होता. त्यानंतरही बंदर विकास न झाल्याने झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी आमदार उदय सामंत मंत्री असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बंदर विकासासाठी या अनधिकृत झोपड्या हटविण्याचे आवाहन मच्छिमारांना केले होते. त्यावेळी मच्छिमारांनी सहकार्याची भूमिका घेत जेटी परिसरातील झोपड्या स्वत:हून हटवल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या बंदराचा विकास कागदावरच राहिल्याने झोपड्या उभ्या राहिल्या. नेहमीप्रमाणे यावेळी बंदर विकासाचे दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मिरकरवाडा जेटी परिसरातील अनधिकृत झोपड्या तत्काळ हटवाव्यात, अशा नोटिसा जिल्हा प्रशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. या झोपड्या २७ जानेवारीपर्यंत स्वत:हून काढून टाकाव्यात, असे झोपडीधारकांना कळवण्यात आले आहे. झोपड्या तोडण्यात येणार असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. (शहर वार्ताहर) दिखाऊ प्रयत्न : आता तरी बंदराचे प्रश्न सुटणार देशातील महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरात अनेक समस्या आहेत. बंदर विकास करण्यासाठी अनेकवेळा येथील झोपडपट्टीधारकांना हटवण्यात आले. त्यामुळे आता तरी या बंदराचे प्रश्न सुटणार का? असा सवाल करण्यात येत आहे. रखडला विकास कोट्यवधी रुपये खर्च करून मिरकरवाडा बंदराचा विकास करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे हा विकास रखडला आहे. अनेकवेळा हा बंदराचा विकास कागदावर राहिल्याने केवळ झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर विकास रखडल्याने तेथे पुन्हा झोपड्या उभ्या राहिल्या.
अनधिकृत झोपड्या हटविण्याच्या नोटीसा
By admin | Published: January 23, 2016 11:16 PM