बांदा : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सटमटवाडी येथील माकडताप संदर्भात आदेश देऊनही संबंधित यंत्रणा अजूनही पूर्णपणे माकडतापावर नियंत्रण मिळवू शकलेली नाही. या ठिकाणी तिन्ही विभागाचे कर्मचारी केवळ हजेरी लावत असून प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचा आरोप सटमटवाडी ग्रामस्थांनी करीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याची गंभीर दखल घेत प्रत्येक विभागाच्या खातेप्रमुखावर जबाबदारी देत रोजचा अहवाल तहसीलदार सतीश कदम यांच्याकडे सादर करण्याची सक्त सूचना करीत हलगर्जीपणा नको असा आदेश दिला.सटमटवाडी व बांदा परिसरात माकडतापामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. चार जणांचा बळी यात गेला आहे. गेल्या सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांद्यात येत परिस्थितीची माहिती घेत आढावा घेतला होता. त्यांनी वनविभाग, आरोग्य विभाग आणि पशु संवर्धन विभागाला या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे आदेश देत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला होता. तसेच शनिवारी केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी येण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार शनिवारी पालकमंत्री केसरकर बांद्यात आले होते. यावेळी त्यांनी सिव्हिल सर्जन डॉ. आर. एस. कुलकर्णी, उपवनसंरक्षक रमेश कुमार यांच्याशी चर्चा करीत माहिती घेतली.या भागात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मात्र, अजूनही तेवढ्याच विहिरी शिल्लक असल्याचे सांगत त्या विहिरींची तपासणी कधी होणार असा सवाल उपस्थित केला. तसेच ज्यांचे बळी गेले त्यांच्याबरोबरच जे यामुळे बाधित आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना याबाबत माहिती देण्याची सूचना केली. उपवनसंरक्षक रमेश कुमार यांनी फवारणी करण्यात येईल पण त्यासाठी लागणारे औषध उपलब्ध झालेले नाही असे सांगितले. यावर डॉ.कुलकर्णी यांनी ओरोस येथून हे औषध उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. डॉ.पाटील यांनी या ठिकाणच्या ३५ विहिरींची तपासणी करण्यात आली असून लवकरच इतर राहिलेल्या विहिरींची तपासणी केली जाईल व पाणी शुद्धीकरणासाठी विहिरीत औषधे टाकली जातील असे सांगितले. दीपक केसरकर यांनी पुढच्या आठवड्यात वनखात्याची बैठक आपण मुंबईत बोलावली आहे. त्यापूर्वी याठिकाणचा अहवाल माझ्याकडे पाठवून द्या अशी सूचना केली. उपवनसंरक्षक रमेशकुमार यांना त्यांनी शिमोगा येथील वनविभागाशी चर्चा करण्याची सूचना करीत त्यांचे पथक या ठिकाणी दोन दिवसात येईल त्यांच्याबरोबर ही मोहिम राबवा अशा सूचना दिल्या. या साथीत ज्यांचे बळी गेलेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच जे बाधित उपचार घेत आहेत त्यांना आपण वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या सूचनेनुसार तिन्ही विभागांची समन्वय बैठक दररोज घ्या व यावर तहसीलदार नियंत्रण ठेवतील असे सांगत माकडताप निर्मूलन करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना व मदत दिली जाईल असे सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, डॉ.कुलकर्णी, उपवनसंरक्षक रमेश कुमार, डॉ.जगदीश पाटील, तहसीलदार सतीश कदम, डॉ. ज्ञानदेव सोडल, वनाधिकारी सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल संजय कदम, वनपाल एस. एस. शिरगावकर, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, भैय्या गोवेकर, आरोग्य सहाय्यक एच. एच. खान, बेंजामिन डिसोझा यांच्यासह ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दररोज अहवाल सादर करण्याच्या सूचना
By admin | Published: March 13, 2017 10:59 PM