कणकवली : काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक विहिरींमध्ये तातडीने टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आले. पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्व मंगल कार्यालयांना पाण्याचे स्त्रोत शुद्ध असल्याच्या खबरदारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नव्या इमारत बांधकामाला वेस्ट ट्रीटमेंट प्लांटशिवाय मंजुरी देणार नसल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. काविळीचे रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने शहरातील ३० सार्वजनिक विहिरींचे पाणी नमुने गोळा केले असून टीसीएल पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच शहरातील सर्व मंगल कार्यालये आणि सामुदायिक कार्यक्रम होणाऱ्या केंद्रांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पाण्याचे स्त्रोत दूषित नाहीत याची खात्री करून घ्यावी, असेही नोटिसीत म्हटले आहे. नगरपंचायतीकडे असलेल्या टीसीएल पावडर साठ्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. क्लोरीनचे प्रमाण घटले असल्यास नवी पावडर मागवण्यात येणार आहे. खाजगी विहिरी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी टीसीएल पावडर घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी ए.ए.आठल्ये यांनी बुधवारी कणकवली संशयित मंगल कार्यालयाला भेट देऊन पाण्याच्या स्त्रोताची स्वत: चाचणी घेतली. या चाचणीत हे पाणी पिण्यासाठी लायक नसल्याचे आढळले. शहरातून गोळा केलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल ४८ तासांनंतर मिळणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सांडपाणी प्रक्रिया बंधनकारक : तावडेशहरात सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था कार्यक्षम नाही. ती सुधारण्याची गरज असून आतापासूनच काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी यापुढे होणाऱ्या प्रत्येक संकुलाच्या बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था असल्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही, असे मुख्याधिकारी तावडे यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आढावाकावीळ रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. नळयोजनेच्या पाणी साठवण टाक्यांचा सर्व्हे करा. पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करा साथ पसरणार नाही याची काळजी घ्या, आदी सूचना संदेश सावंत यांनी दिल्या. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे तसेच खासगी विहीरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकावी, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
कणकवलीतील मंगल कार्यालयांना नोटिसा
By admin | Published: February 04, 2015 9:49 PM