देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना २१ आॅक्टोबर रोजी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाणार आहे. एक महिन्यानंतर या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होईल. त्यामुळे लवकरच देवगड नगरपंचायतीबाबत कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जठार म्हणाले की, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नगरपंचायतीची प्रसिद्धी नोटीस देणे महत्त्वाचे असते. ही नोटीस त्यावेळी दिली गेली नसल्याने २०१४ नंतर या नगरपंचायतीला विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळेच देवगड नगरपंचायतीचा गेली तीन वर्ष टाइमपास शो झाला व आता ‘टाइमपास २’चा शो आमदार नीतेश राणे करत आहेत. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कालावधीत देवगड जामसंडे पाणी प्रश्न नगरोत्थान योजनेमधून घेण्यात यावा, असा ठराव करून देवगडचा पाणीप्रश्नही निकाली निघणार आहे, असे जठार यांनी सांगितले. तारामुंबरी मिठमुंबरी पुलाला नवीन अंतर्गत पर्यायी रस्ता शोधल्याने या पुलाचेही काम येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, स्थानिकांना मोबदलाही योग्य मिळणार आहे. देवगड तालुक्यातील ८ खाडींवरील पूल उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचेही जठार यांनी सांगितले. मोंड वानिवडे खाडीवरील पुलाचे बांधकाम करणे, जामसंडे पाटकरवाडी ते इळये वरणवाडी जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, फणसे पुरळ कलंबई जोडणाऱ्या खाडीवर पूल उभारणे, गिर्ये तरबंदर ते मोहुळ गाव जोडणाऱ्या खाडीवर पुलाचे बांधकाम करणे, वळीवंडे खराडा जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे, टेंबवली वानिवडे जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, कोटकामते कुपलवाडी जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, तालुक्यातील खाडीवरील पूल होणे महत्त्वाचे आहे. मंजुरी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. तसेच या गावातील होणाऱ्या खाडीवरील पुलासाठी जमीनही पूल होण्याअगोदरच जिल्हा प्रशासनाने संपादन करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)--काँग्रेसमुळेच विलंब : जठारदेवगड जामसंडे नगरपंचायतीची प्रारूप स्वरूपाची अधिसूचना १५ मे २०१२ रोजी निघाली होती. मात्र, या नगरपंचायतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव लागतो.हा ठराव २ वर्षांनंतर सन २०१४ रोजी पाठविण्यात आला. यामुळेच देवगड जामसंडे नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्यानेच त्यांच्यामुळेच व माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ही नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे.
देवगड नगरपंचायतीची आज अधिसूचना
By admin | Published: October 20, 2015 11:35 PM