वेंगुर्ले ,दि. ०४ : आंबा बागायतीस पूरक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत देशी गायीच्या मल व मूत्रापासून बनविलेल्या जीवामृताचा नियमित डोस दिल्याने वेंगुर्ले भटवाडी येथील आंबा बागेतील झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे.
आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात पडते. त्यामुळे हे वातावरण आंबा झाडास मोहोर येण्यास उपयुक्त असते. पण अलीकडे वातावरणात थंडपणा नसल्याने थंडीचा जोर कमी आहे. हे वातावरण आंबा पिकास पोषक नसताना वेंगुर्ले-भटवाडी येथील अँस्ट्रेक फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, ऊस, केळी, हळद, काळी मिरी तसेच पूरक आंतरपिके घेतली जातात.
या फार्म हाऊसवर देशी गायींची पैदास केलेली असून त्यांच्या मल व मूत्रापासून जीवामृताची निर्मिती करून सर्वच झाडांना अशा जीवामृताचा दर दहा ते पंधरा दिवसांनी झाडाच्या वयोमानानुसार दहा लीटरचा डोस दिला जातो. आंबा झाडांना पोषक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे.शून्य खर्च नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंबयेथील व्यवस्थापक सुशांत खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची टीम शून्य खर्च नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करीत आहे. त्यामुळे त्यांना सकारात्मक निकाल मिळत आहे. अलीकडेच शून्य खर्च नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी या फार्म हाऊसला भेट देऊन प्रशंसा केली होती.