मालवण : पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सनंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर केरळच्या ‘गळ’ पद्धतीच्या मासेमारीचे नवे संकट उभे ठाकले आहे. मालवणसह सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर केरळीयन बोटीकडून सुरमई आणि कटर अशा किंमती मासळीची लयलूट सुरु आहे. पर्ससीनचा प्रश्न निकाली लागला म्हणून सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या पारंपरिक मच्छिमारांसमोर नव्या संकटामुळे पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, किनारपट्टी भागातील काही मच्छिमारांनी या संकटाबाबत बैठक घेवून मासेमारीवर झालेल्या परिणामाबाबत चिंता व्यक्त करताना या नौकांना हटविण्याची तयारी सुरु केली. तरी काही बोटी स्थानिक मच्छिमारांच्या नावे असल्याचे बोलले जात आहे. कमिशन पद्धतीने हा व्यवसाय सुरु असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षात काही प्रमाणात असलेल्या या केरळच्या नौका यावर्षी वाढल्या आहेत. मालवण शहरालगत दांडी वगळता अन्य किनाऱ्यावर या बोटी दिसून येत आहेत. चिवला बीच येथे काही दिवसापूर्वी बोटींच्या वाढत्या संख्येने मच्छिमारात वादही भडकला होता. पर्यटक तसेच मत्स्य खवय्यांकडून मोठी मागणी असलेल्या सुरमई मासळीची मोठ्या प्रमाणात मासेमारी केरळ नौकांकडून केली जात आहे. सुरुवातीला काही मोजक्याच नौका असल्याने मच्छिमारांकडून दुर्लक्ष करण्यात आला. मात्र, नौकांची वाढती संख्या मच्छिमारांना डोकेदुखी ठरत आहे. (प्रतिनिधी) केरळात जातेय ९० टक्के चलन केरळ राज्यात चालणाऱ्या या व्यवसायात मासेमारी जाळ्याचा वापर होत नाही. अगदी किनाऱ्यापासून खोल समुद्रात गळ टाकून मासेमारी केली जाते. सुरुवातीला येथील काही स्थानिक मच्छिमारांनी या केरळच्या बोटी आणल्या होत्या. मात्र, आता बहुतांश अन्य व्यावसायिक तसेच धनदांडगे टक्केवारीतून नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिळालेल्या मासळीचा दहा टक्के मोबदला स्थानिकांना मिळत असून उर्वरित ९० टक्के मोबदला केरळीयन बोटींना होत आहे. गळ मासेमारीचे तंत्रही वेगळे असून स्थानिक मच्छिमारांनी अपेक्षित तंत्र आत्मसात करता आलेले नाही. दरम्यान, स्थानिक मासेमारीवरही गळ पद्धतीच्या मासेमारीमुळे मोठा परिणाम जाणवत आहे.
मच्छिमारांसमोर आता केरळीयन बोटींचे संकट
By admin | Published: February 28, 2016 12:11 AM