कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे जिवीत व वित्त हानी झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करू असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे कणकवलीत पाणी घुसले. त्यामुळे ८३ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आता हिंम्मत दाखवत ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण विरोधात गुन्हा दाखल करून पालकमंत्र्यांनी दिलेला आपला शब्द पाळावा. असा टोला कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला आहे.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील आपल्या दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, स्वाभिमान पक्ष शहराध्यक्ष राकेश राणे, बंडू गांगण, किशोर राणे, संदीप नलावडे, राजू गवाणकर , सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.समीर नलावडे पुढे म्हणाले, मुंबई - गोवा महामार्ग हा समृध्दीचा आहे . अशी घोषणा करून चौपदरीकरणाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आताच्या महामार्ग दुरावस्थेचे आणि जनतेच्या झालेल्या नुकसानीचेही श्रेय घ्यावे. तसेच आमदारकीचा राजीनामा देईन असा इशारा देणारे आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री योग्य तो धाक अधिकारी आणि प्रशासनावर ठेवण्यास कमी पडले आहेत. प्रशासन सुस्थितीत चालवण्याची धमक आणि अभ्यास फक्त माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यातच आहे. हे महामार्ग चौपदरीकरणाच्या मुजोर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासमोर हतबल झालेल्या सत्ताधाऱ्यांमुळे दिसून आल्याचा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी लगावला.ते पुढे म्हणाले, १० मे रोजी आम्ही जेव्हा महामार्गाच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले आणि पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला, तेव्हा अनंत हॉटेल आणि त्या परिसरातील महत्वाची कामे झाली. ज्या कामांच्या सूचना देऊन सुध्दा ठेकेदाराने काम केले नव्हते, अशा माजी आमदार विजय सावंत आणि अॅड. उमेश सावंत यांच्या घरानजीकच्या ओहळात पाणी साचून रामेश्वर प्लाझातील रहिवासी, सारस्वत बँक यांचे नुकसान झाले.
मुळातच माजी आमदार विजय सावंत यांनी डीपीप्लॉनमध्ये स्पष्ट उल्लेख असलेल्या त्या ओहळावर बांधकाम करून स्लॅब ओतून त्याचा मार्ग छोटा केला आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना त्या ओहळाची स्वच्छता करायला ते देत नाहीत. त्यामुळे दिलीप बिल्डकॉन आणि महामार्ग प्राधिकरण इतकेच विजय सावंत हेही या परिसरात पाणी साचण्यास जबाबदार आहेत.दिलीप बिल्डकॉन आणि महामार्ग प्राधिकरण सत्ताधाऱ्यांचे ऐकत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आमदार वैभव नाईक यांनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला तर कुठे हे ठेकेदार सत्ताधाऱ्यांची दखल घेतील. वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर, महामार्ग प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खारेपाटण ते झाराप असा एकदा मोटरसायकलवरून प्रवास करून बघावा.
महामार्ग चौपदरीकरणाचे श्रेय घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर पुढे असतात. आता याच लोकांनी जनतेला होणाऱ्या त्रासाचेही श्रेय घ्यावे. आम्ही विरोधक म्हणून अनेक गोष्टी सुचविल्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनाच जेथे जुमानले जात नाही, त्यांना काडीचीही किंमत दिली जात नाही . तेथे आम्ही कितीही इशारे दिले तरी काही मर्यादा येतात, हे जनतेलाही ज्ञात आहे. प्रथम सर्व्हिस रस्ते डांबरीकरण करून सुरळीत सेवा देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे.असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.आता फक्त कायदा हातात घेणेच बाकी !जेव्हा कणकवलीकरांच्या हक्कासाठी आणि सेवेसाठी खरी लढाई लढायची होती . तेव्हा ती आमदार नितेश राणे यांनी लढली. जिल्हाधिकाऱ्यांना कणकवलीत येऊन बसायला लावले. कणकवली शहरातील बहुतांश प्रश्न आमदार नितेश राणे यांनी ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांना सूचना देऊन मार्गी लावून घेतले. आम्ही जी आंदोलन केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामे सुस्थितीत करण्याचे सुचविले.
ते आ़मदार राणे यांच्या सुचनेनुसारच केले आहे. ते आमचे नेते असल्याने अनेक वेळा अधिकारी आणि नगरपंचायत पदाधिकारी यांच्या एकत्रीत बैठका शहरातील नागरीकांना सेवा देण्यासाठी घेतल्या . मुजोर अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी विरोधक म्हणून जेवढे करता येईल तेवढे आम्ही केले. आता फक्त कायदाच हातात घ्यायचे बाकी राहिले आहे. असे समीर नलावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले..... तर शेडेकर आणि गौतम कुमार यांना गडनदी पुलाला बांधू !महामार्ग ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक गौतम कुमार व महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर कणकवलीत फिरकायचे बंद झाले आहेत. आता शहरात पुन्हा पाणी भरले आणि जनतेला त्रास झाला तर या गौतम कुमार आणि प्रकाश शेडेकर यांना गडनदीच्या पुलाला दोरीने बांधून ठेवावे लागेल. तशी वेळ आमच्यावर त्यांनी आणू नये. असा इशारा समीर नलावडे तसेच उपस्थित नगरसेवकांनी यावेळी दिला.