सिंधुदुर्गनगरी : समाजमंदिरे ही विकासाचा केंद्रबिंदू तयार व्हावा. तरुणांना उत्तम ज्ञान मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ग्रामविकास, वित्त राज्यमंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलेसिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्यायभवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम सामाजिक सप्ताह समारोप कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवलीच्या छाया नाईक, सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केसरकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी केलेल्या कार्याचे मोल नाही. जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्त्व आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भूषण होते. डॉ. बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावसाठी ज्या ठिकाणी समाजमंदिरे आहेत त्या ठिकाणी छोटीशी ग्रंथालये उभारण्याचा विचारही केसरकर यांनी व्यक्त केला. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन दुर्बल व वंचित घटकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवीत आहे. समाजकल्याण विभागाने शासनाच्या प्रत्येक योजनांची चांगल्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धीे करून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवाव्यात. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना दारिद्र्यरेषेवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मतही दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले, सामाजिक सप्ताहाच्या निमित्ताने गेले सहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. यामधून समाजकल्याण विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि त्यांची जिल्हास्तरावर करण्यात आलेली अंमलबजावणी ही चांगल्या प्रकारे करण्यात आली असून, अशा उपक्रमांचे सातत्य राखणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)विभागासाठी स्वतंत्र वेळकेसरकर म्हणाले, समाजकल्याण विभागातर्फे विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी व त्यांचे सबलीकरण होण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना विशेष मागासवर्गासाठी राबविण्यात येतात. योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. समाजकल्याण विभागासाठी स्वतंत्र वेळ देऊन या विभागातील योजना व त्यांंची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही केसरकर यावेळी म्हणाले.
समाजमंदिरांसाठी विशेष निधी देऊ
By admin | Published: April 15, 2015 9:17 PM