देवगड : कुणकेश्वर सेवा सोसायटीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी ६ हजार रुपये रक्कम लांबविली आहे. या घटनेने कुणकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या सचिव वैष्णवी धुवाळी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.गुरुवारी नेहमीप्रमाणे त्या कार्यालय ६ वाजता बंद करून गेल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजता कार्यालय उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास दरवाजा उघड दिसला व कुलूप तोडलेले होते. त्यांनी संस्थाचालकांना याची कल्पना दिली.संस्था पदाधिकारी व सचिव वैष्णवी धुवाळी यांनी कार्यालयाकडे येत पाहणी केली.
यावेळी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी कपाट फोडले व आतील ६२०० रुपये रक्कम लांबविली. याबाबत पोलिसांना माहिती देताच सहाय्य्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले व कर्मचाऱ्यांनी भेट तेथे जात घटनेचा पंचनामा केला.ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. देवगड शहरात ज्वेलर्स महेश घारे यांच्या दुकानात चोरी केल्यानंतर तीन दिवसांत चोरट्यांनी देवगडपासून जवळच असलेल्या कुणकेश्वरमध्ये चोरी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.