सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील १४ शिक्षकांची संच मान्यता अनुशेष डावलून केल्याचा ठपका ठेवत माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक मधुकर राठोड आणि लिपिक एस. टी. शेंडगे या दोघांनाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी निलंबित केले. सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील काही शिक्षक संच मान्यता देण्यात आल्या होत्या. या सर्व मान्यता अनुशेष डावलून (सेक्टर) तसेच पदे नसताना मान्यता दिली होती. या विरोधात कास्ट्राईब संघटनांनी वरिष्ठांकडे दाद मागितली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने त्या सर्व शिक्षकांचे वेतन थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. वेतन थांबविण्याच्या निर्णयाविरोधात यातील काही शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने या शिक्षकांचे वेतन थांबवू नये, असे आदेश दिले होते. शिक्षणाधिकारी आटुगडेंच्या काळातील प्रकरणदरम्यान, या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. आर. आटुगडे यांच्या कालावधीत ही मान्यता देण्यात आली होती. मात्र आरुगडे यांची बदली झाली असल्याने या संदर्भातील फायलींची हाताळणी कार्यालयीन अधीक्षक मधुकर राठोड आणि लिपिक एस. टी. शेंडगे यांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणात या दोघांनाही चौकशीत दोषी मानत शिक्षण सहसंचालक कोल्हापूर यांनी या दोघांनाही निलंबित करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना केल्या होत्या. त्यानुसार शेखर सिंह यांनी राठोड आणि शेंडगे या दोघांना निलंबित केले असून, राठोड यांची रवानगी दोडामार्ग येथे तर शेंडगे यांची रवानगी कणकवली पंचायत समिती येथे करण्यात आली आहे.
कार्यालयीन अधीक्षक, लिपिक निलंबित
By admin | Published: May 14, 2016 12:24 AM